मुंबईकरांची वेगवाहिनी असलेले पूर्व तसेच पश्चिम द्रुतगती महामार्ग, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, घाटकोपर-अंधेरी रस्ता, कुर्ला-अंधेरी रस्ता, लाल बहादूर शास्त्री मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग, सायन-धारावी रस्ता अशा सर्वच रस्त्यांवर बसवलेल्या पेव्हर ब्लॉक्सनी जमिनीशी आपली नाळ तोडली आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना गाडी चालवताना अतिशय सांभाळून चालवावी लागत आहे. चारचाकी वाहनेही अत्यंत कुर्मगतीने रस्त्यांवरून जातात. पाऊस आला, तर परिस्थिती याहूनही खराब होते. पाण्याखाली गेलेले खड्डे चुकवता चुकवता चालकांच्या नाकी नऊ येत आहेत आणि वाहतुकीचे नियंत्रण करताना वाहतूक पोलिसांची हालतही खराब झाली आहे.
पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता म्हणून जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडकडे पाहिले जाते. दर दिवशी या रस्त्यावरून हजारो वाहने ये-जा करतात. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर मिलिंद नगर पुलाजवळ प्रचंड खड्डे पडले होते. या खड्डय़ांमुळे आधीच अरूंद असलेल्या या भागात वाहतूक कोंडी होत होती. अनेकदा पार एक किलोमीटर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. पालिकेने बुधवारी रात्री हे खड्डे काही प्रमाणात बुजवले खरे परंतु ही मलमपट्टी फारतर चार दिवस टिकेल, असा शेरा एका वाहतूक पोलिसाने मारला.
जोगेश्वरी येथून हा रस्ता सुरू होतो तेथेही रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक्स उखडले आहेत. त्यामुळे वाहनांच्या वेगाला खिळ बसते. येथेही दुचाकीस्वारांसाठी पेव्हर ब्लॉक्स मृत्यूचे सापळे ठरू शकतात. या रस्त्यावर अवजड वाहनांची ये-जा असल्याने पुढील काळात या रस्त्याची अवस्था आणखीनच वाईट होऊ शकते, असे येथील वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.
पूर्व उपनगरांतून जाणाऱ्या लालबहादूर शास्त्री मार्गावरही अनेक ठिकाणी खड्डे झाले आहेत. या खड्डय़ांचे वैशिष्टय़ म्हणजे जेथे काँक्रिटचा किंवा डांबरी रस्ता आहे, तेथे हे खड्डे नाहीत. तर दोन पट्टय़ांच्या मध्ये पेरलेले पेव्हर ब्लॉक्स निघाल्याने हे खड्डे पडले आहेत. यापैकी काही खड्डे दुचाकीस्वारांसाठी जीवघेणे ठरू शकतील, असेच आहेत. भांडूप-मुलुंड, कुर्ला-घाटकोपर या स्थानकांदरम्यानच्या रस्त्यात या खड्डय़ांचे प्रमाण जास्त आहे. कांजुरमार्गजवळील गांधीनगर पुलाखालचा रस्ता तर पालिकेने दुरुस्तीच्या नावाखाली आणखीनच बिघडवून ठेवला आहे. पवईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गाच्या सुरुवातीला पालिकेने रेती आणि खडी पसरल्याने दुचाकीस्वारांना आणखीनच धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. घाटकोपर पश्चिमेहून अंधेरी पूर्वेला जाणाऱ्या रस्त्यावरही खड्डय़ांची रांगोळी पसरली आहे. असल्फा, साकीनाका येथून जाणाऱ्या या रस्त्यावर मेट्रोचे काम चालू आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे या रस्त्याला खड्डय़ांचे अस्तित्त्व नवीन नाही. खड्डय़ांबरोबरच जलनि:सारणाची सोय चांगली नसल्याने पाऊस पडला की रस्त्यात पाणी तुंबते आणि वाहतुकीचा वेग खुंटतो. या रस्त्यावर साकीनाका हे महत्त्वाचे जंक्शन आहे. येथेही खड्डे असल्याने कुल्र्याहून, पवईहून या दिशेला येणाऱ्या वाहनांची कोंडी होते. पूर्व द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुल हे खड्डय़ांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. यापैकी खोदादाद सर्कल येथील उड्डाणपुलाची परिस्थिती बिकट आहे. सायन स्टेशनजवळून जाणाऱ्या पुलाच्या सुरुवातीला खड्डेच खड्डे असल्याने पुलाआधी वाहतूक कोंडी ठरलेली असते. मात्र यंदा आश्चर्यकारकरित्या हा पुल खड्डेविरहित ठेवण्यात प्रशासन यंत्रणांना यश आले आहे. या पुलावरील खड्डय़ांची कमी कांजूरमार्ग-विक्रोळी यांच्यामधील उड्डाणपुलाने भरून काढली आहे. त्याचप्रमाणे मुलुंड, नवघर येथील उड्डाणपुलावरही खड्डे आहेत. रमाबाई आंबेडकर नगर परिसरातून जाणाऱ्या वाहनांना खड्डय़ांचा प्रसाद मिळाल्याशिवाय राहत नाही. येथेही पेव्हर ब्लॉकमुळे रस्त्यामध्ये एकसंधता नसल्याचा फटका दुचाकी वाहनांना बसतो. त्याचप्रमाणे या रस्त्यावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे खड्डय़ांमध्ये भर पडते.
पूर्व मुक्तमार्गाखालील रस्ता खड्डेमुक्त होणार का?
गेल्याच आठवडय़ात सुरू झालेल्या पूर्व मुक्तमार्गाच्या उद्घाटनासाठी स्वत: मुख्यमंत्री जातीने हजर होते. मुक्तमार्गावरून सैर करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी एकदा वाडीबंदर येथील मुक्तमार्गाखालून जाणाऱ्या रस्त्यानेही जाऊन यायला हवे होते. मुक्तमार्ग हा वाहनांसाठी स्वर्गीय अनुभव असेल, तर वाडीबंदर येथील मुक्तमार्गाखालचा रस्ता म्हणजे नरकयातना आहेत. उखडलेले पेव्हर ब्लॉक्स, काँक्रिट आणि डांबरी रस्ता यांमध्ये पडलेले खड्डे यांमुळे या रस्त्यावर वाहनांचे टाके ढिले होतात. त्यात जोरदार पावसाची एक सर आली, तरी खड्डे, रस्ते आणि तळे यातील सीमारेषा पुसट होऊन त्याचा त्रास चालकांना होत आहे.