रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील यंत्रमाग कामगारांना १४ पैशांची मजुरी वाढ करण्यात आली. हा निर्णय यंत्रमाग कापड उत्पादक असोसिएशन व कामगार संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीत सकारात्मक चर्चा होउन ५२ पिकास ८० पैसे मजुरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला. त्यामुळे यंत्रमाग कामगारात उत्साहाचे वातावरण आहे.
रेंदाळ परिसरात यंत्रमागाचे जाळे मोठय़ा प्रमाणात आहे. १० हजारांवर यंत्रमाग असून २ हजारावर कामगार आहेत. कामगारांच्या मजुरीवाढीचा करार होऊन ३ वर्ष झाली. महागाईमुळे यंत्रमाग कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. परिणामी काही कामगार हा व्यवसाय सोडून पंचतांराकित औद्योगिक वसाहतीत आजही कामाला जात आहेत. यंत्रमाग कामगारांची अवस्था तसेच व्यवसाय बंद पडण्याच्या स्थितीत असल्याचे पाहून यंत्रमाग कापड उत्पादक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी कामगार संघटनेचे नेते शशिकांत करडे, वसंत तांबे यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा करून ५२ पिकाला ८० पैसे मजुरीवाढ देण्याचे निश्चित केले. त्यामध्ये १४ पैशांची वाढ होउन ८० पैसे मजुरीवाढ करण्यात आली. तसेच जॉबर, दिवाणजी यांच्या पगारात त्या प्रमाणात वाढ करण्याचे ठरविण्यात आले. या निर्णयामुळे यंत्रमाग कामगारांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. बैठकीस यंत्रमाग कापड उत्पादन असोसिएशनचे रावसाहेब तांबे, अरु ण महाजन, महमंद मुजावर, कामगार संघटनेचे शशिकांत करडे, वसंत तांबे, शशिकांत माळी आदी उपस्थित होते.