काळाच्या पडद्याआड गेलेले ‘पडदे’ जतन
 जीर्ण झालेल्या पडद्यांना नवे रूप
मराठी रंगभूमीवर सादर होणाऱ्या विविध नाटकांमध्ये आता सरसकट ‘बॉक्स सेट’चा वापर केला जात असला तरी काही वर्षांपूर्वी नाटकांमध्ये रंगविण्यात आलेले ‘पडदे’ मोठय़ा प्रमाणात वापरले जात होते. हे पडदे नाटकाचा अविभाज्य भाग असत. तिसरी घंटा झाल्यानंतर पडदा उघडला की रंगमंचावरील रंगविलेल्या पडद्याला पहिल्यांदा टाळ्या मिळत असत. हे पडदे आता काळाच्या पडद्याआड गेले असले तरी यापूर्वी सादर झालेल्या नाटकांमधून वापरण्यात आलेले काही पडदे मुंबई मराठी साहित्य संघाने जतन केले आहेत. अगदी जीर्ण झालेल्या काही पडद्यांची डागडुजी करून नवे रूप दिले आहे तर काही पडदे मूळ पडद्याप्रमाणे पुन्हा नव्याने रंगवून घेण्यात आले आहेत.
मुंबई मराठी साहित्य संघाची १९३५ मध्ये स्थापना झाली. साहित्य संघातर्फे नंतरच्या काळात अनेक नाटके सादर करण्यात आली. यात प्रामुख्याने ऐतिहासिक, पौराणिक, संगीत नाटकांचा समावेश होता. त्या वेळी संघाने या नाटकांसाठी वेगवेगळे पडदे तयार करून घेतले होते. संघाने आपल्या स्वत:च्या तसेच अन्य संस्थांच्या नाटकांसाठीही हे पडदे उपलब्ध करून दिले होते. साहित्य संघाकडे सध्या असे १५ पडदे जतन केलेले आहेत. अगदी पूर्वीपासून वापरण्यात येणारे तीन ते चार पडदे असून ते आता जीर्ण झाले आहेत. त्यामुळे त्यांचा आता वापर केला जात नाही. काही पडद्यांची डागडुजी करून घेण्यात आली तर काही जुन्या पडद्यांसारखे तंतोतंत तसेच पडदे नव्याने तयार करून घेतले असल्याची माहिती साहित्य संघाच्या नाटय़शाखेचे कार्यवाह सुभाष भागवत यांनी ‘वृत्तान्त’ला दिली.
आमच्या संस्थेच्या ‘करीन ती पूर्व’, ‘बेबंदशाही’, ‘आग्ऱ्याहून सुटका’ आदी ऐतिहासिक, ‘संगीत सौभद्र’, संगीत स्वयंवर’या पौराणिक-संगीत नाटकांमधून तर ‘ललित कलादर्श’च्या ‘जय जय गौरी शंकर’ आदी नाटकांतून हे पडदे वापरले गेले होते. साहित्य संघाने नुकतेच ‘होनाजी बाळा’ हे जुने नाटक नव्या संचात सादर केले आहे. या नाटकात आम्ही जुन्या नाटकात वापरलेले आणि आता त्यावरून नव्याने तयार करून घेतलेले पडदे वापरत आहोत. कारागृह, महाल, दाट जंगल, पर्वत, नदी अशा प्रकारची दृश्ये असलेले हे पडदे प्रसिद्ध चित्रकारांकडून रंगविले जात असत. साहित्य संघासाठी मोहन आणि रमेश राऊळ यांनी अनेक पडदे तयार केले असल्याचे भागवत यांनी सांगितले.
या पडद्यांची घडी घातली जात नाही तर ते गुंडाळून किंवा नाटय़गृहात व्यासपीठावर अगदी वरच्या बाजूस असलेल्या मोठय़ा दांडीवर टांगून ठेवले जातात. साहित्य संघात आम्ही या पडद्यांची अशाच प्रकारे जपणूक केली आहे. हे सर्व पडदे १४ फूट उंच आणि २६ फूट रुंद इतक्या भव्य आकारात आहेत. त्या वेळच्या नाटकांमधून या पडद्यांच्या पाश्र्वभूमीवरच नाटक सादर व्हायचे. काही वर्षांपूर्वी डॉ. निसार आलाहना यांनी प्रकाशित केलेल्या ‘बॅक ड्रॉप्स ऑफ द १९ सेंच्युरी-मराठी संगीत नाटक’ या पुस्तकातही साहित्य संघाच्या नाटकात वापरल्या गेलेल्या काही पडद्यांचा सचित्र उल्लेख केला असल्याचेही भागवत म्हणाले.