मोनिका आथरेला विशेष पुरस्कार निश्चित
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवा संचालनालयतंर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या जिल्हा क्रीडा पुरस्काराच्या रकमेत यंदा भरघोस वाढ करण्यात आल्याने चुरस निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतलेला असल्याने धावपटू मोनिका आथरेला विशेष तर खेळाडू गटातूनच महिला म्हणून तलवारबाज श्वेता शिंदे यांना पुरस्कार निश्चित मानला जात आहे. दरवर्षी एक मे या महाराष्ट्र दिनी देण्यात येणारे हे पुरस्कार यंदा २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी प्रदान करण्यात येणार आहेत.
राज्यस्तरीय शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांच्या धर्तीवर जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू, कार्यकर्ता, मार्गदर्शक यांना गौरविण्यात यावे या हेतूने जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. या वर्षांपासून पुरस्कारांच्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. मार्गदर्शक व कार्यकर्ता गटासाठी याआधी किमान ५० वर्ष ही वयोमर्यादा होती. ती आता ३० वर्ष करण्यात आली आहे. याशिवाय वरिष्ठ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेव्यतिरिक्त कनिष्ठ व शालेय राष्ट्रीय, राज्य, पायका स्पर्धेतील कामगिरीचाही विचार या दोन्ही गटांसाठी केला जाणार आहे. पुरस्काराचे स्वरूपही बदलण्यात आले असून तीन हजाराऐवजी १० हजार रूपये, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.
खेळाडू गटात जलतरणपटू प्रसाद खैरनार, धावपटू मोनिका आथरे, खो खो पटू स्वप्निल गिते, तलवारबाज श्वेता शिंदे व जय शर्मा यांचे प्रस्ताव कार्यालयास प्राप्त झाले आहेत. कार्यकर्ता गटात योगेश अलई, अविनाश खैरनार, नंदकिशोर खैरनार, भास्कर कविश्वर तर मार्गदर्शक गटात जितेंद्र कर्डिले (रोइंग), निर्मला चौधरी (तलवारबाजी), राजेंद्र निंबाळते व वाळू नवले (जलतरण) यांच्यामध्ये चुरस आहे. पुरस्कारांसाठी आलेले सर्व प्रस्ताव छाननी समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले असून लवकरच अंतीम पुरस्कारार्थीची नावे जाहीर करण्यात येतील, असे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.