तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने गंगापूर धरणातून डावा तट कालव्यास आवर्तन सोडावे, या मागणीसाठी सोमवारी सय्यदपिंप्री संघर्ष समितीच्यावतीने गंगापूर धरण परिसरातील डावा तट कालव्याजवळ ‘जल प्राणायाम’ आंदोलन करण्यात आले. हजारो ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी ठिय्या देत पाणी सोडण्याची मागणी केली. जिल्हा प्रशासनाने मंगळवारपासून पहिले आवर्तन सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
काही दिवसांपासून या गावास तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. विहिरी, कुपनलिका कोरडय़ा पडल्या असून पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. या पाश्र्वभूमीवर, ग्रामस्थांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत जलप्राणायाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी सय्यदपिंप्री पाणी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. सोमवारी सकाळी गावातील सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेऊन ग्रामस्थांनी गंगापूर धरणाकडे कूच केले. रस्त्यात आडगाव येथे या मुद्यावर सर्वाची चर्चा केली. त्यानंतर आसपासच्या ग्रामस्थांसह हजारो शेतकरी गंगापूर धरणावर जमले.
आंदोलकांनी धरणाच्या हद्दीत प्रवेश करू नये म्हणून पोलीस यंत्रणेनेही कडेकोट बंदोबस्त ठेवला. प्रशासनाने गावातील परिस्थितीची यापूर्वी पाहणी केली आहे. गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य असून गंगापूर धरणातून पाणी सोडणे आवश्यक असल्याकडे आंदोलकांनी लक्ष वेधले. डावा तट कालव्याजवळ ठाण मांडणाऱ्या ग्रामस्थांनी टंचाईबद्दल आपल्या व्यथा मांडल्या. दरम्यानच्या काळात प्रशासनाने आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. परंतु, आंदोलकांनी त्यास दाद दिली नाही. यामुळे प्रांताधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
आंदोलकांनी दाद न देता नाशिक-गिरणारे रस्त्यावर काही काळ ठिय्या दिला. उपस्थित अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून या प्रश्नावर चर्चा केली. त्यानंतर मंगळवारपासून पाणी सोडण्याची तयारी दर्शविली. या कालव्याचे पहिले आवर्तन सोडण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.