गंगापूर तालुक्यातील गवारीवस्ती येथे शाळाखोलीचे बांधकाम न करता ५ लाख ९३ हजार ५२४ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सेवानिवृत्त मुख्याध्यापक भानुदास सुखलाल चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश शिक्षण अधिकारी नितीन उपासनी यांनी बजावले. तसेच लासूर व लासूर स्टेशन येथील शाळांमधील २२ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
शाळा सुरू झाल्यानंतर शाळेची पटनोंदणी, उपस्थिती व गुणवत्ता तपासण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी मंगळवारी अचानक भेटी दिल्या. गंगापूर तालुक्यातील गवारीवस्ती येथे सर्वशिक्षा अभियानांतर्गत शाळाखोलीचे बांधकाम मंजूर केले होते. यासाठी ५ लाख ९३ हजार ५२४ रुपयांची तरतूद केली होती. या रकमेचा मुख्याध्यापक चव्हाण यांनी अपहार केल्याचे तपासणीअंती उघड झाल्याने त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
औरंगाबाद तालुक्यातील लासूर व लासूर स्टेशन येथील शाळांनाही त्यांनी भेट दिली. शाळेचा परिसर कमालीचा अस्वच्छ होता. शालेय पोषण आहार निकृष्ट होता. शाळेतील उपस्थितीही कमी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर येथील २२ शिक्षकांना नोटिसा बजावण्यात आल्या. तसेच जुना पदभार न देता नवीन शाळेत रुजू होऊन आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या मुख्याध्यापकासही नोटीस बजावण्यात आली. शिक्षण विभागाच्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.