शहराला पाणी पुरवठा करणारा थेरवडी तलाव कोरडा ठाक पडल्याने मगील २३ दिवसांपासून नळ कोरडे पडले आहेत. तीव्र पाणी टंचाईने नागरीक त्रस्त झाले आहेत. शहहरात पाणी खरेदी-विक्रीचा व्यवसायाच सुरू झाला असून त्यात दररोज तब्बल पाच लाख रूपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज व्यक्त होतो. तालुक्यातील मिरजगाव व राशिन या दोन मोठय़ा गावांमध्येही कमी-अधिक फरकाने हीच स्थिती आहे.
तालुक्यातील ६१ गावे व २४९ वाडया-वस्त्यांवर सध्या ६५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहेशहरात मात्र २३ दिवस झाले नळावाटे पाणीपुरवठा बंद आहे. शहरातील हातपंप देखील कोरडे पडले आहेत. मिळेल त्या ठिकाणांहून नागरिक पाणी भरत आहेत. त्यासाठी मोठी भटकंती करावी लागते, शिवाय पाणी विकत घ्यावे लागते. त्याचेही भाव तेजीत आहेत. खाजगी ट्रॅक्टरवर टाकी ठेऊन पाणी विक्री केली जात आहे. सध्या एक रूपया लिटर दराने पाणी विकले जाते. प्रत्येक कुटूंबाला सरासरी १०० रूपयांचे पाणी रोज विकत घ्यावे लागत असून या व्यवसायात दररोज तब्बल पाच लाख रूपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज व्यक्त होतो.  टँकरवर सरकारचेही दररोज तालुक्यात २ लाख ६० हजार रूपये खर्च होतात.
पाणीटंचाईने उग्र रूप धारण करूनही अधिकारी व पदधिकारी हे मात्र गंभीर नाहीत असे दिसते. कुकडीचे आवर्तन सुटल्यावर थेरवडी तलाव पुर्ण भरून दिला तर किमान चार महिने म्हणजे जुनपर्यंत पाणी पुरेल. याशिवाय दूरगाव तलाव व सीना धरणाबरोबर तालुक्यातील अन्य २५ तलाव कुकडीच्या पाण्याने भरण्याची गरज आहे तरच पाणी टंचाई कमी होईल.
कर्जत हा नगर जिल्हयातील सर्वात जास्त दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात पिकांची आणेवारी ५० टक्के पेक्षा कमी लागली आहे. खरीप व रब्बी या दोन्ही हगांमात पिक वाया गेली आहेत. तालुक्यात सुरवातीला २० चारा डेपो  होते, त्यावर तालुक्यात १४ कोटी रूपये वाटप करण्यात आले. तालुक्यात आता ९२ छावण्यांमध्ये ३७ हजार जनावरे होती.  त्यातील ७० छावण्या मध्यंतरी बंद करण्यात आल्या. काही काळ छावण्या बंद ठेवल्यावर पुन्हा चारा शिल्लक आहे का याची पहाणी करून त्यानुसार छावण्या देण्यात सुरवात झाली आहे. सध्या तालुक्यात ६२ छावण्या सुरू आहेत. त्यात लहान ३ हजार ८७६ व मोठी ३१ हजार ८५५ जनावरे आहेत.