कुकडीचे आवर्तन सुरू झाले असून या आवर्तनात कर्जत तालुक्यातील परीटवाडी, करपडी व काळेवाडी या गावातील पाझर तलाव भरू द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादीच्या लीगल सेलचे अध्यक्ष सुरेश शिंदे यांनी केली आहे. हे तिन्ही तलाव अद्याप कोरडेच आहेत.
तालुक्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. परंतु राशिन परिसरातील करपडी, खैदानवाडी, मानेवाडी, शिंपोरा, बाभुळगाव दुमाला, परिटवाडी, आखोणी, काळेवाडी, रौकाळेवाडी या परिसरात मात्र अजूनही समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळेच हे तलाव अजूनही कोरडेच आहेत. शिंदे यांनी सांगितले, की या भागात कमी-अधिक पावसावर पिके चांगली आली आहेत, मात्र मोठय़ा पावसाअभावी विहिरीतील पाण्याची पातळी वाढलेली नाही.
परीटवाडी, करपडी व काळेवाडी या पाझर तलावांवर परिसरातील सर्व गावांच्या पिण्याच्या पाण्याची योजना अवलंबून आहेत. सध्या कुकडीचे ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले आहे. या आवर्तनामधून हे पाझर तलाव भरून दिले तर या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. मात्र आता पाणी सोडले नाही तर लगेचच पुन्हा टँकर सुरू करावे लागतील व त्यावर मोठा खर्च होईल. पूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार आता हे तलाव भरून द्यावे अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.