कौटुंबिक असहायतेचा गैरफायदा घेऊन २२ वर्षीय मतिमंद युवतीवर ५२ वर्षीय व्यक्तीने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना कार्वे (ता. कराड) येथे उघडकीस आली आहे. गर्भधारणा झालेल्या मतिमंद युवतीचा गर्भपात करण्यात आला तेव्हा साडेचार महिन्यांचे अर्भक तिच्या पोटात होते. या गर्भपातानंतर या घटनेला वाचा फुटली. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अत्याचार झालेल्या २२ वर्षीय मतिमंद युवतीच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे. आई व मतिमंद युवती अशा दोघीच घरी असतात. काही दिवसांपूर्वी या युवतीची विवाहित बहीण माहेरी (कार्वे) आली होती. यावेळी तिला आपल्या मतिमंद बहिणीस गर्भधारणा झाल्याचा संशय आला. त्याबाबत तिने आईलाही माहिती दिली. बहिणीने तिला रूग्णालयात नेऊन तिची वैद्यकीय तपासणी करून घेतली. या तपासणीत तिला गर्भधारणा झाली असल्याचे समोर आले.
गर्भधारणेची बाब उघडकीस आल्याने या कुटुंबाला मोठा धक्का बसला. अविवाहित व मतिमंद असलेल्या या युवतीची शारीरिक व मानसिक स्थिती ठीक नसल्याने कुटुंबीयांनी वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करून तिचा गर्भपात करवून घेतला. यावेळी साडेचार महिन्यांचे मृत अर्भक तिच्या पोटात होते. या अर्भकास कुटुंबीयांनी कार्वे (ता. कराड) येथील कृष्णा पुलाच्या उत्तरेकडील बाजूस मळीच्या शेतात दफन केले. खासगी रूग्णालयात अ‍ॅडमिट असताना ज्या डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले त्यांना त्या मतिमंद युवतीने गर्भपात झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी (सोमवार दि. २२) घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यामुळे रूग्णालयाच्यावतीने याबाबत कराड ग्रामीण शहर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी रूग्णालयात जाऊन सदर मतिमंद युवतीकडे सखोल चौकशी केली. त्या वेळी तिने गुदरलेला प्रसंग कथन केला. पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे, पोलीस निरीक्षक बरकत मुजावर यांनी सदर युवतीकडे चौकशी करून नातेवाइकांचे जबाब नोंदवून याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कार्वे (ता. कराड) येथील ५२ वर्षीय नराधमावर गुन्हा नोंद केला. पोलिसांनी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमवेत घटनास्थळी जाऊन दफन केलेले मृत अर्भक काढले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत अर्भकाचे घटनास्थळी शवविच्छेदन करून गुन्ह्याच्या कामी मदत होण्याच्या दृष्टीने काही नमुने घेतले आहेत. याबाबत आणखी काही पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून शास्त्रीय पुरावे शोधण्यावर पोलिसांचा भर आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बरकत मुजावर करत आहेत.