शहरातील सिल्व्हर ओक शाळेतील कर्मचाऱ्यांविरूध्द विनयभंगाची खोटी तक्रार दाखल करून व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचच्या वतीने सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश शिंदे यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपल्या न्याय्य हक्कासाठी एक वर्षांपासून मंचची मदत घेत आहेत. त्यांनी त्यासाठी ‘सिटू’ शी संलग्न कर्मचारी संघटनेची स्थापनाही केली आहे. वर्षांपूर्वी शाळा व्यवस्थापनाने विजय मरसाळे या शिक्षकाविरुद्ध हंगामी तत्वावर सुरक्षा कर्मचारी म्हणून कार्यरत एका महिलेकरवी छेडछाड व विनयभंग केल्याची खोटी तक्रार दाखल केली होती. आता त्याच महिलेकरवी आणखी सहा कर्मचाऱ्यांविरुद्ध विनयभंगाची खोटी तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या महिला अत्याचाराविरुद्ध निर्माण झालेल्या वातावरणाचा गैरफायदा घेत सिल्व्हर ओक व्यवस्थापन या कर्मचाऱ्यांना बदनाम करण्याचा प्रकार करत असल्याचे मंचने निवेदनात म्हटले आहे. कॉ. श्रीधर देशपांडे, छाया देव व विजय मरसाळे यांनी हे निवेदन दिले.