एस.आर.ए. प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या विरोधात मुंबईतील झोपडीधारक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे सर्व एस.आर.ए. प्रकल्पांची चौकशी करा आणि मुंबईत राजीव गांधी आवास योजना लागू करा आदी मागण्यांसाठी नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच मानखुर्द ते आझाद मैदान असा दोन दिवसाचा पायी मोर्चा काढत शेकडो झोपडीधारक रस्त्यावर उतरले आहेत.
राज्यात सध्या सुरू असलेल्या योजनांसाठी १९९५ पूर्वीचेच झोपडीधारक पात्र होत असल्यामुळे बाकी झोपडीधारकांना याचा लाभ मिळत नाही. त्यातच बऱ्याच ठिकाणी एस.आर.ए. प्रकल्पामध्ये मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यात राजीव गांधी आवास योजना लागू करावी, सर्व एस.आर.ए. प्रकल्पांची चौकशी व्हावी आणि शहराच्या नियोजन आराखडय़ाबाबत जनसुनवाई घेऊन लोकांची भूमिक समजून घ्यावी या प्रमुख मागण्या आंदोलना दरम्यान करण्यात आल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. आभिनेते सदाशिव अमरापूरकरही यामध्ये सहभागी झाले होते.