शहरातील रस्तारुंदीकरणासाठी नगरपालिकेंतर्गत बृहत् आराखडय़ाचे काम हाती घेण्यात आले आहे. यापूर्वी दोन टप्प्यांत रस्तारुंदीकरण करण्यात आले. याचा तिसरा टप्पा बलभीम चौक ते जुना बाजार वेसपर्यंत सुरू झाला आहे. या भागात मोजणी पूर्ण करण्यात आली.
शहरातील राजुरी वेस-कारंजा-बलभीम चौक रस्त्याचे रुंदीकरणाचे काम गेल्या ऑगस्टमध्ये नगरपालिकेने सुरू केले होते. रस्त्यावरील अतिक्रमण नागरिक, व्यापाऱ्यांनी स्वत:हून काढले. पहिल्या टप्प्यात ४० फुटी रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झाले. दुसऱ्या टप्प्यात बलभीम चौक ते माळी वेस भागातील रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. हे काम सुरू असताना काही व्यापाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. न्यायालयाने पालिकेच्या बाजूने निकाल देत ४० फुटांच्या आतील रुंदीकरणासाठी अडथळा ठरणारी बांधकामे हटविण्याचे आदेश दिले. रुंदीकरणास अडथळा ठरणाऱ्या अनेक इमारतींवर नगरपालिकेने बुलडोझर फिरवले. अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटविण्यात आले. या रुंदीकरणांतर्गत मंदिर-मशिदीचा काही भागही सामंजस्याने पाडण्यात आला. बृहत् आराखडय़ाचे दोन टप्पे पूर्ण झाल्यानंतर बलभीम चौक ते जुना बाजार वेस रस्तारुंदीकरण्याचे काम सुरू झाले. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रस्त्याची मोजणी करून मार्किंग टाकले आहे. आठवडाभरात येथे अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येणार आहे. नगराध्यक्ष डॉ. दीपा क्षीरसागर, गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या नियोजनांतर्गत बृहत् आराखडय़ाचे काम पूर्ण होत आहे.