महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक-शिक्षकेतर महासंघाच्या वतीने येत्या सोमवारी, २९ एप्रिल रोजी लातूर येथे बालवाडी शिक्षक कर्मचाऱ्यांचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन आयोजिल्याची माहिती महासंघाचे प्रदेश प्रवक्ते कृष्णा हिरेमठ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लातूरच्या व्यंकटेश माध्यमिक विद्यालयात आयोजिलेल्या या अधिवेशनाचे उद्घाटक शालेय शिक्षण राज्यमंत्री प्रा. फौजिया खान आहेत. गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर, माजी मंत्री बसवराज पाटील, आमदार अमित देशमुख, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण आदींची उपस्थिती राहणार आहे. याशिवाय शिक्षक आमदार तथा महासंघाचे कार्याध्यक्ष भगवानराव साळुंखे व मनसेचे गटनेते आमदार बाळा नांदगावकर यांचीही उपस्थिती राहणार आहे.
खासगी शाळांना जोडून असलेल्या बालवाडय़ांना शासनाने मान्यता द्यावी, बालवाडय़ांसाठी कायदा व नियमावली तयार करावी, सध्या कार्यरत असलेल्या सर्वच सेविकांना वेतन व भत्ते निश्चित करावेत, बालवाडीसाठी विद्यार्थ्यांचे वय निश्चित करून त्यानुसार शासनाचा अभ्यासक्रम व नियोजन करावे, बालवाडय़ांसाठी पोषण आहार योजना लागू करावी आदी मागण्या या अधिवेशनात मांडल्या जाणार असल्याचे हिरेमठ यांनी सांगितले.