जिल्हा शालेय वाहतूक रिक्षा कृती समितीने गेल्या चार दिवसांपासून पुकारलेला संप गुरुवारी मागे घेतला. रिक्षाचालकांच्या मागण्यांबाबत परवा (शनिवार) होणा-या जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या सभेत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. रिक्षाचालक शुक्रवारपासून शालेय विद्यार्थ्यांची नियमित वाहतूक करणार आहेत.
राज्य सरकारने शालेय वाहतूक करणा-या रिक्षा व इतर वाहनांसाठी सुरक्षा नियमावली लागू केली आहे. त्याची अंमलबजावणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व पोलिसांनी सुरू केली आहे. शालेय वाहतूक करणा-या वाहनांसाठी २२ नियम तयार करण्यात आले आहेत. तसेच शाळास्तरावर वाहतूक समिती स्थापन करण्यास सांगितले गेले आहे. तीनआसनी रिक्षात ४ विद्यार्थ्यांची वाहतूक करणे आर्थिकदृष्टय़ा परवडत नसल्याने, ८ ते १० विद्यार्थ्यांची तर चारचाकी वाहनात १२ ते १५ विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास परवानगी द्यावी जेणेकरून पालकांनाही भाडे परवडले पाहिजे, चालकांची उपासमारी होत असल्याने मनमानी दंड व रिक्षा निलंबित करणे अशी कारवाई करू नये आदी मागण्यांसाठी रिक्षाचालकांनी चार दिवसांपूर्वी, सोमवारपासून अचानकपणे संप सुरू केला.
असंघटित रिक्षाचालकांनी जिल्हा हमाल पंचायतचे नेतृत्व स्वीकारले आहे. गेली तीन दिवस प्रशासनाने या संपाकडे लक्ष दिले नाही. आज संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकरराव घुले, ज्ञानेश्वर राऊत, ताजोद्दीन मोमीन, किरण पवार, संजय आव्हाड, दत्तात्रेय साबळे, शेख सलीम आदींनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांची भेट घेतली. कांबळे यांनी त्यांना या प्रश्नावर रस्ते सुरक्षा समितीच्या सभेतच निर्णय होऊ शकतो, असे स्पष्ट करत पालकांना वेठीला न धरता संप मागे घेण्याचे आवाहन केले. त्यास संघटनेने प्रतिसाद दिला. संप मागे घेतल्याचे व शुक्रवारपासून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू होत असल्याचे घुले यांनी सांगितले.
शनिवारी रस्ते सुरक्षा समितीची सभा जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत होईल, त्यास संघटना, पालक, मुख्याध्यापक व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. अॅपे रिक्षाचालकांनी त्यांचा स्वतंत्रपणे सुरू असलेला संप कालच मागे घेतला.