दिल्लीत तरुणीवर झालेल्या भीषण अत्याचाराचे पडसाद नगरमध्येही उमटले असुन त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आज सकाळी अहमदनगर कॉलेजमधील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला तर सायंकाळी विविध स्वयंसेवी संघटनांनी मशाल मोर्चा काढला. अत्याचार करणाऱ्यांना फाशीच द्या अशी मागणी आंदोलकांनी केली.
अहमदनगर कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ. रिचा शर्मा, डॉ. माया उंडे, डॉ. लता डागवाले, डॉ. रुपाली दळवी, लक्ष्मीप्रभा उधाडे, शबनम गुरंग यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव यांना घटनेचा निषेध करणारे निवेदन दिले. घटनेतील दोषींना कठोर शिक्षा करावी, मुली व महिलांना घराबाहेर सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे यासाठी गांभीर्याने उपाययोजना करावी, छेडछाडीस प्रतिबंध करण्यासाठी शाळा, कॉलेजच्या वेळात पोलीसांचे फिरते पथक तैनात करावे, रत्यांवरील फलकांवर पोलीसांचे हेल्पलाईन क्रमांक लिहावेत आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. सायंकाळी गांधी मैदानातुन स्वयंसेवी संस्थांनी दिल्लीतील घटनेचा निषेध करण्यासाठी मशाल मोर्चा काढला. स्नेहालय, चाईल्ड लाईन, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, आधार ग्रुप तसेच विविध कॉलेजमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. स्नेहालयचे अध्यक्ष सुवालाल शिंगवी यांच्या हस्ते मशाल पेटवण्यात आली. महिलांही मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. महिलांवरील अत्याचार थांबवा, अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्या, अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदे करा, अशा घोषणा देण्यात आल्या. गांधी मैदानातुन निघालेला मोर्चा चितळे रस्ता, तेलीखुंट, कापडबाजार,माणिक चौक, शनी गल्ली मार्गे पुन्हा गांधी मैदानात विसर्जीत करण्यात आला. कापडबाजारात मोर्चेकऱ्यांनी मेणबत्ती पेटवुन समाजाला अत्याचाराच्या विरोधात जागे होण्याचे अवाहन केले. शिंगवी, शाम असावा, मोनिका मध्यान, पुजा सुगंधी, प्रणव जोशी आदींची भाषणे झाली.