महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी आज जिल्ह्य़ातील पदाधिका-यांसमवेत, मुंबईत ‘कृष्णकुंज’ वर हजेरी लावत पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली, मात्र नगरच्या महापलिकेतील सत्तेत सहभागी व्हायचे की नाही, राष्ट्रवादी आघाडीला की युतीला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय मात्र नगरसेवकांना उद्या, मंगळवारी कळवला जाणार आहे.
नगरसेवक किशोर डागवाले, गणेश भोसले, सुवर्णा जाधव, वीणा बोज्जा यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी वसंत लोढा, सचिन डफळ, सतीश मैड, संजय झिंजे, अनिता दिघे आदींनी ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे यांनी प्रथम सर्वांची एकत्रित भेट घेतली, निवडून आलेल्या नगरसेवकांचे अभिनंदन केले. नंतर नगरसेवक व पदाधिकारी यांची स्वतंत्र भेट घेऊन त्यांची मते जाणून घेतली. पुन्हा पक्षाचे नेते आमदार बाळा नांदगावकर यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले. तेथेही पुन्हा नांदगावकर यांनी प्रत्येकाची स्वतंत्र मते जाणून घेतली. ठाकरे व नांदगावकर या दोघांनीही आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत काय परिस्थिती राहील याची माहिती पदाधिका-यांकडून घेतली.
मात्र नगरच्या महापालिकेतील सत्तेत सहभागी व्हायचे की नाही, विरोधात बसायचे का, सत्तेत सहभागी झाले तर राष्ट्रवादी की युती यापैकी कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय ठाकरे हे नांदगावकर यांच्यामार्फत नगरसेवकांना उद्या, मंगळवारी कळवणार आहेत. दरम्यान, असे असले तरी मनसेच्या काही नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप यांच्याशी यापूर्वीच संधान बांधले आहे, त्यामुळे ठाकरे यांनी वेगळा काही निर्णय दिल्यास पुन्हा मागील सत्तेसारखा पेच मनसेत निर्माण होणार का, याबद्दल औत्सुक्य व्यक्त होत आहे.