मध्य रेल्वेच्या ४० लाख प्रवाशांपैकी बहुतांश प्रवासी ज्या पट्टय़ातून येतात, तो ठाणे ते कल्याण हा पट्टा प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये या पट्टय़ात तब्बल ५९ प्रवाशांचे प्राण गर्दीमुळे लोकल गाडीतून पडल्याने गेले. तर या कालावधीत गाडीतून पडल्याने ८८ जणांना दुखापतीला सामोरे जावे लागले आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेवर अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या प्रवाशांची संख्या वर्षांला सुमारे सात हजार एवढी असते. या दोन्ही रेल्वेमार्गावर सुमारे एवढेच प्रवासी जखमी होतात. यात सर्वाधिक संख्या ही रूळ ओलांडताना दगावलेल्या प्रवाशांचा आहे. त्याखालोखाल गाडीतून पडून मृत अथवा जखमी झालेल्यांचा आकडा येतो. ही संख्या ठाणे ते कल्याण या दरम्यान प्रचंड असल्याचे आढळले आहे.
ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, ऐरोली आदी स्थानके येतात. तर डोंबिवली लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत कोपर, डोंबिवली, ठाकुर्ली या स्थानकांचा समावेश आहे. नव्या वर्षांच्या पहिल्या तिमाहीत या दोन्ही स्थानकांदरम्यान गाडीतून पडून जखमी झालेल्यांची संख्या दिवसाला एक एवढी आहे. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत गेल्या तीन महिन्यांत २१ जण गाडीतून पडून जखमी झाले. तर एवढेच प्रवासी याच कारणामुळे दगावले. ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत गाडीतून पडून जखमी झालेल्यांची संख्या ६७ एवढी आहे. तर मृतांचा आकडा ३८ एवढा आहे.
ठाणे ते कल्याण या स्थानकांदरम्यान गाडीतून पडून जखमी होणाऱ्या किंवा मृत्युमुखी पडणाऱ्या प्रवाशांची संख्या एवढी जास्त असताना रेल्वे प्रशासन मात्र हे अपघात थांबवण्यास असमर्थ आहे. नव्या गाडय़ा ताफ्यात येईपर्यंत किंवा पाचवी-सहावी मार्गिका तयार होईपर्यंत गाडय़ांच्या फेऱ्या वाढवणे शक्य नाही. डब्यांची संख्या वाढवण्यासाठीही नव्या गाडय़ांची गरज आहे, असे उत्तर प्रशासनातर्फे देण्यात आले.