विद्यार्थी असल्याचे सांगून एका भामटय़ाने शिक्षकाच्या मोटारसायकलवर लिफ्ट मागितली आणि वाटेत शिक्षकाजवळील सोनसाखळी व मोबाइल संच बळजबरीने हिसका मारून चोरून नेल्याची घटना शहरातील होटगी रस्त्यावर नवोदय नगराजवळ रात्री घडली. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
वसंत श्रीरंग घुगे (वय ४६, रा. रामलाल नगर, होटगी रोड, सोलापूर) या शिक्षकाने याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार रात्री पावणे अकराच्या सुमारास ते आपल्या  मोटारसायकलवरून नवी पेठेतून कपडे खरेदी करून घराकडे निघाले होते. वाटेत त्यांना एका तरूणाने हाक मारून थांबविले. सर, मी आपला विद्यार्थी आहे, मला मजरेवाडी येथे जायचे असून तेथपर्यंत मोटारसायकलवर सोडण्याची विनंती त्याने केली. त्यानुसार सौजन्य दाखवित घुगे यांनी त्याचे नाव विचारून व चौकशी करीत मोटारसायकलवर पाठीमागे बसविले. पुढे जाताना नितीन जाधव असे नाव सांगणाऱ्या तरूणाने घरी संपर्क साधण्यासाठी शिक्षक घुगे यांना मोबाइल मागितला. मोबाइल घेतल्यानंतर लगेचच या तरूणाने पाठीमागून हिसका मारून घुगे यांच्या गळ्यातील सोनसाखळी काढून घेतली व तो धूम पळाला. जबरी चोरीस गेलेल्या ऐवजाची किंमत ४४ हजारांएवढी होती.
जबरी चोरीचा दुसरा प्रकार
माळशिरस तालुक्यातील नातेपुतेजवळ  वालचंदनगर रस्त्यावर पिराळे गावच्या शिवारात मोटारसायकलवरून प्रवास करणाऱ्या एका व्यापाऱ्याला तिघा चोरटय़ांनी सशस्त्र हल्ला करून दोन लाखास लुटले. परमेश्वर संदीपान कांबळे (वय ४२, रा. गोडसे वस्ती, दहिगाव, ता. माळशिरस) असे लुटल्या गेलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. कांबळे हे वालचंदनगर, लासुर्णे, सोनगाव, इंदापूर आदी भागातून व्यापाराची उधारी वसूल करून गावाकडे परत निघाले होते. परंतु   वाटेत पाठीमागून दोन मोटारसायकलवरून आलेल्या तिघा चोरटय़ांनी कांबळे यांच्यावर पाठीमागून लोखंडी  गज व लाकडी दांडक्याने हल्ला केला. ते खाली कोसळताच चोरटय़ांनी त्यांच्या मोटारसायकलच्या डिकीतून दोन लाखांची रोकड बळजबरीने पळविली. नातेपुते पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद झाली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुजय घाडगे हे करीत आहेत.