महापालिकेच्या वतीने १५ महिन्यांपासून वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन करण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ २० जून रोजी सकाळी ११ ते २ या कालावधीत राजीव गांधी भवनसमोर आंदोलन करण्याचा निर्णय आम आदमी पार्टीतर्फे घेण्यात आला आहे.
वृक्ष प्राधिकरण समितीच अस्तित्वात नसल्याने शहर परिसरातील पर्यावरणाच्या संवर्धनार्थ पालिकेकडून होणे अपेक्षित असलेल्या घडामोडी थांबल्या आहेत. त्यामुळेच आम आदमी पार्टीतर्फे ४ व १२ जूनला राजीव गांधी भवनसमोर ११ ते २ या वेळेत   निदर्शने   करण्यात आली होती.
पालिका आयुक्तांना सर्वपक्षीय १२ पर्यावरणवादींची नावे सुचविण्यात आली होती. लवकरच समिती स्थापन करण्यात येईल, असे आयुक्तांचे म्हणणे आहे. परंतु गुरुवारी होणाऱ्या महासभेच्या विषयपत्रिकेत वृक्ष प्राधिकरण समितीचा विषय समाविष्ट करण्यात आलेला नसल्याने पार्टीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात    वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमी नाशिककरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.