सांगलीवाडी येथील टोलचे भूत गाडण्यासाठी कृती समितीने बुधवारी सांगली बंदची हाक दिली असून दुस-या दिवशीही ठेकेदाराची टोल वसुली बंद राहिली.  टोल विरोधी कृती समितीचे टोल नाक्यावर मंगळवारी धरणे आंदोलन सुरूच होते.
सांगली-इस्लामपूर मार्गावर खासगीकरणातून उभारण्यात आलेल्या पुलाच्या खर्चापोटी ठेकेदार कंपनीकडून टोलवसुली सुरू आहे. या टोलला कायमचे हटविण्यासाठी कृती समितीच्या माध्यमातून सर्वपक्षीय आंदोलन पुकारण्यात आले आहे. या संदर्भातील मुंबईत सोमवारी झालेली बठक कोणत्याही ठोस निर्णयाविना अनिर्णीत राहिल्याने कृती समितीने आंदोलन सुरूच ठेवले आहे.  सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी कायदेशीर बाबी तपासून टोल हटविण्यासंदर्भात दोन दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन कृती समितीला दिले आहे.  पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनीही टोल विरोधी जनक्षोभ मुख्यमंत्र्यांच्या कानी घातला आहे.  ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी कृती समितीच्या समवेत जाऊन बांधकाम मंत्र्यांकडे सांगलीकरांची मागणी मांडली आहे.
टोल हटविण्याबाबत चर्चा करण्यासाठी बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना तातडीने मुंबईला पाचारण केले आहे.
दरम्यान, टोल विरोधी कृती समितीने टोल हटावच्या मागणीसाठी बुधवारी सांगली बंदची हाक दिली आहे.  सर्वपक्षीय संघटनेने पुकारलेल्या बंद मध्ये व्यापारी वर्गही सहभागी होणार आहे.  गणपती मंदिरापासून भव्य रॅली काढून टोल हटावची मागणी करण्यात येणार असल्याचे कृती समितीच्यावतीने केलेल्या आवाहनात म्हटले आहे.  आज सलग दुसऱ्या दिवशी टोल नाक्यावर कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले.  गेल्या दोन दिवसांपासून नाक्यावरील टोल वसुली बंद असून अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आला आहे.