राज्यात टोलविरोधात जनतेत वाढलेला असंतोष, त्यातच राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने छेडलेले आंदोलन आणि तोंडावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर अखेर राज्य शासनाने १० कोटींपेक्षा कमी खर्चाचे टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सोलापूर जिल्ह्य़ातील चार टोलनाके बंद होणार आहेत. त्याबद्दल नागरिकांत समाधान व्यक्त होत असले तरी शहरातील खराब रस्त्यांसाठी सुरू असलेले टोलनाकेही बंद व्हावेत, अशी मागणी केली जात आहे.                                 
१० कोटींपेक्षा कमी खर्चाच्या रस्त्यांसाठी जे टोलनाके उभारण्यात आले आहेत, ते टोलनाके बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्य़ातील चार टोलनाके बंद होणार असल्याचे मानले जात आहे. यात अक्कलकोट- दुधनी रस्त्यावरील मैंदर्गी येथील टोलनाका, करमाळा-नगर रस्त्यावरील मांगी बाह्य़वळणावरील टोलनाका, पंढरपूर  तालुक्यातील टाकळी-कासेगाव रस्त्यावरील टोलनाका व सोलापूर-बार्शी रस्त्यावरील भोगावती नदीच्या पुलावरील टोलनाका याप्रमाणे चार टोलनाके बंद होण्याची अपेक्षा आहे. अक्कलकोट-दुधनी रस्त्यासाठी चार कोटी ९५ लाख खर्च झाले असून त्यासाठी डी.बी. कन्स्ट्रक्शन कंपनीकडून टोलवसुली होत आहे. तर करमाळा-मांगी बाह्य़वळणावरील रस्त्याचा खर्च सहा कोटी ७५ लाख एवढा झाला असून त्यापोटी एनकेटी टोल रोड कंपनीमार्फत टोलवसुली होते. टाकळी-कासेगाव रस्त्याचा खर्च सहा कोटी ३० लाखांचा असून त्यापोटीची टोलवसुली बिल्डकॉन कंपनी करते. तर सोलापूर-बार्शी रस्त्यावर भोगावती नदीवर तीन कोटी ६२ लाख खर्च करून बांधलेल्या पुलासाठी सोलापूरच्या गणेश बिल्डर्स कंपनीकडून होते.
या चारही टोलनाके असलेल्या रस्त्यांचा खर्च यापूर्वीच टोलच्या माध्यमातून वसूल झाला असताना अद्याप ही टोलधाड सुरूच असल्याचे बोलले जाते. अखेर आंदोलनानंतर का असेना, हे टोलनाके बंद होणार असल्याचे समाधान सार्वत्रिक स्वरूपात व्यक्त होत असताना इकडे सोलापूर शहरात राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुमारे ७८ कोटी खर्च करून बांधलेल्या ३७ किलो मीटर अंतराच्या रस्त्यांची गुणवत्ता राखली गेली नसताना त्यावर टोलवसुली केली जात आहे. गेल्या सात वर्षांपासून ही टोलधाड सोलापूरकर निमूटपणे सहन करीत आहेत. या टोलधाडीत सर्वपक्षीय हितसंबंध गुंतल्यामुळे कोणीही त्याविरोधात आवाज उठवित नाहीत.