कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प मार्गी न लावता तो दाबण्याचा प्रयत्न केला जात असून, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सुरुवातीपासून पाठपुरावा करणारे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचेही पद्धतशीरपणे खच्चीकरण केले जात असेल तर वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा मोहिते-पाटील समर्थक तथा राज्य भूविकास बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत घोडके यांनी दिला.
विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विजय प्रताप युवा मंचच्या तुळजापूर तालुका शाखेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना ७० हजार वहय़ा वाटप करण्याचा शुभारंभ सोलापूरजवळील तामलवाडी येथे करण्यात आला. त्या वेळी घोडके हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. तामलवाडीचे सरपंच ज्ञानोबा राऊत हे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संतोष बोबडे यांच्यासह तुळजापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल रोचकरी, माजी सरपंच दत्तात्रेय वडणे, बापूसाहेब पाटील आदींची उपस्थिती होती.
कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचा लाभ सोलापूर व उस्मानाबादसह सहा जिल्हय़ांतील ३१ तालुक्यांना होणार आहे. परंतु हा प्रकल्प होऊ नये म्हणून आडकाठी आणली जात असून यात श्रेयवादाचे राजकारण खेळले जात असल्याचे नमूद करीत चंद्रकांत घोडके यांनी येत्या दोन महिन्यांत या प्रकल्पाला मूर्त स्वरूप लागले नाहीतर संपूर्ण लाभक्षेत्रातून सर्वपक्षीय लढा उभा करावा लागेल, असा इशारा दिला. या वेळी संतोष बोबडे, विशाल रोचकरी, बापूसाहेब पाटील आदींनी स्थिरीकरणाच्या मुद्याला सक्रिय पाठिंबा दिला. विजय प्रताप मंचचे अध्यक्ष दत्ता शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. नागनाथ मसुते यांनी सूत्रसंचालन केले, तर सर्जेराव गायकवाड यांनी आभार मानले.