मानव विकास मिशनअंतर्गत विद्यार्थिनींना मोफत प्रवासासाठी दिलेल्या ६२५ एस. टी. बस महामंडळ लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वापरत आहे. ज्या कारणांसाठी नवीन बस दिल्या होत्या त्यासाठीच त्यांचा उपयोग करावा, अशी सूचना आमदार सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेत केली.
विद्यार्थिनींची सोय व्हावी, म्हणून राज्य सरकारने मानव विकास मिशनला १०९ कोटी रुपये मंजूर केले होते. ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणात अडथळा होऊ नये, म्हणून शाळेच्या वेळेवर बस सोडण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती. मात्र, एस. टी. महामंडळाकडे पुरेशा संख्येने बसगाडय़ा नसल्याने विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र बससेवा देणे जवळपास अशक्य असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सरकारने मानव विकास मिशनअंतर्गत विशेष निधी देण्याचे ठरविले. निधी दिल्यावरही बरेच दिवस बसबांधणीचे काम सुरू होते. त्यामुळे विद्यार्थिनींना त्याचा फारसा उपयोग होऊ शकला नाही. नव्या गाडय़ा महामंडळाकडे उपलब्ध झाल्या, तेव्हा अधिकाऱ्यांनी त्या लांब पल्ल्यासाठी राखून ठेवल्या. परिणामी काही मार्गावर जुन्याच बसगाडय़ा पाठविल्या. अनेक ठिकाणी ही सोयच उपलब्ध करून दिली जात नाही. बसच्या देखभाल-दुरुस्तीसही खर्च देऊ, असे मानव विकास मिशनतर्फे कळविले होते. मात्र, एस. टी. महामंडळाने योजनेचा मूळ हेतूच बदलला. अनेकदा शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनी नाईलाजाने इतर वाहनांमधून घर गाठतात. मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याने ग्रामीण भागातील पालकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. ज्या कारणासाठी निधी दिला, तो त्याच कारणासाठी वापरावा, अशी सूचना चव्हाण यांनी केली.