देशभरातील नामांकित ७० कंपन्यांचा सहभाग असलेल्या ‘वास्तुविश्व २०१२’ या बांधकाम व गृहसजावट साहित्याच्या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन कराड आर्किटेक्ट अॅण्ड इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय कदम यांच्या हस्ते करण्यात आले. असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य व प्रदर्शनातील सहभागी कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
भारतरत्न सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस अभिवादन केल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली आणि प्रदर्शन सर्वाना पाहण्यास खुले करण्यात आल्याचे जाहीर करून उद्घाटनाचा सोहळा आटोपता घेण्यात आला. प्रदर्शनात विविध नामांकित ७० हून अधिक कंपन्यांचा सहभाग आहे.  प्रमुख प्रायोजक असलेल्या पुण्याच्या नांदेड सिटी या प्रकल्पाचे प्रवेशद्वारावरील भव्य दालन प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरले आहे. कन्स्ट्रक्शन मशिनरी व इक्विपमेंटमध्ये युनिव्हर्सल, उजगावकर, कॉसमॉस, तेजस या दिग्गज कंपन्यांचा सहभाग आहे. जे. के. सिमेंटची स्वागत कमान लक्षवेधी ठरली आहे. मलकापूरच्या शैलेश नर्सरीच्या स्वागत कमानीसमोरील दालनाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दर्शविला आहे. बांधकाम साहित्यामध्ये आधुनिक केमिकल कंपन्यांचा सहभाग आहे.  गृहसजावटीमध्ये चैतन्य कर्टनशॉपी, के. पी. फर्निसिंग, मयूर रेक्झीन तसेच फ्लोरिंग टाईल्समध्ये मुनीर सुतार, कृष्णा टाईल्स, हिंदुस्थान टाईल्स व जलाराम टाईल्स या कंपन्यांचा सहभाग आहे. सिमेंटमध्ये जे. के. सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, चित्तानाड सिमेंट, स्टिलमध्ये (सळी) कालिका, राजुरी, उमा, शिर्डी, टाटा स्टिल या कंपन्यांचा सहभाग असून, प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हे प्रदर्शन २१ तारखेपर्यंत म्हणजेच सलग तीन दिवस खुले राहणार आहे.