पुढील महिन्यात दर दुप्पट
मधल्या काळात थंडीचा जोर वाढल्याने शेतमालाचा तुटवडा जाणवत आहे. थंडी भाजीपाला, फळभाज्यांना मानवणारी नसल्याने  त्याचा प्रतिकूल परिणाम शेती उत्पादनावर झाला आहे. यामुळे भाज्यांचे दर वाढले असून ही परिस्थिती यापुढे कायम राहण्याची शक्यता आहे. शहरात जिल्हा परिसरातून भाजीपाला विक्रीसाठी दाखल होतो. मात्र यंदा अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस न झाल्याने पाण्याचा असणारा तुटवडाही शेती मालावर परिणाम करत आहे. पुढील महिन्यात भाज्यांचे दर सध्यापेक्षा दुप्पट होतील.    -रवि बोडके, किरकोळ विक्रेता

भेंडी, गवार, वाटाणा
६० ते ८० रूपये किलो
थंडीचा जोर आता ओसरू लागल्याने उन्हाची तीव्रता जाणवायला सुरूवात झाली आहे. कमी पावसामुळे आधीच भाजीपाला कमी प्रमाणात पिकत असल्याने त्यातच आता उन्हाचे तडाखे बसणे सुरू झाल्याने भाजीपाला कडाडला आहे. पंधरवडय़ापूर्वी बऱ्यापैकी स्वस्त असणारा भाजीपाला दिवसेंदिवस महाग होऊ लागला असून  भेंडी, गवार, वाटाणा, घेवडा या भाज्या तर किरकोळ बाजारात ६० ते ८० रूपये किलोच्या घरात गेल्या आहेत. भाज्यांचे चढे दर पाहता महिलांनी आपला मोर्चा कडधान्यांकडे वळविणे पसंत केले आहे. या पुढे भाजीपाल्यांचे दर कमी होण्याची कोणतीच शक्यता नसून उलट ते अधिकाधिक वाढत जातील, असे विक्रेत्यांचे म्हणणे असल्याने गृहिणीचे बजेट कोलमडणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
जीवनावश्यक वस्तूंमध्ये होणाऱ्या दरवाढीमुळे मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्यांना घरखर्च चालवितांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच आता भाजीपाल्यांचे दर वाढल्याने त्यांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे.
डिसेंबरच्या प्रारंभी काही काळ थंडीचा जोर वाढल्याने भाजीपाल्याची आवक बाजार समितीच्या आवारात मोठय़ा प्रमाणावर झाल्याने १५ दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात भाजीपाल्यांचे दर किलोसाठी साधारणत २० ते ४० रुपयांच्या आत होते. त्यामुळे महिलावर्ग सुखावला होता. नव्या वर्षांच्या सुरूवातीस मात्र हे चित्र पालटले असून किरकोळ बाजारात बहुतेक भाज्यांनी चाळीशी गाठली आहे तर, गवार, श्रावणघेवडा व शेवग्याच्या शेंगांसाठी प्रति किलो ८० रुपये मोजावे लागत आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातही भाज्यांची आवक काहीशी मंदावल्याने पालेभाज्यांसह अनेक भाज्यांचे भाव वाढले आहेत. यामध्ये (प्रति क्विंटल) वांगी १०००-२०५०, कारले १६६२५-३७५०, गिलके-८२५-१८७५, भेंडी-२५००-४१०० रूपये असे दर आहेत. बुधवारी समितीच्या आवारात गवारची आवकच झाली नसल्याने किरकोळ बाजारात गवार ८० ते १०० रूपये किलोपर्यंत पोहोचली होती.
भाज्यांचे वाढलेले भाव गृहिणींसाठी डोकेदुखीचा विषय ठरत आहे. बुधवारी किरकोळ बाजारात (सर्व दर प्रति किलो) टोमॅटो  १५, काकडी ४०, वांगी ४०, गाजर ३०, शेवग्याच्या शेंगा ८०, दुधी भोपळा १० रुपये नग, गवार ८०, गिलके व दोडके ५०, कारले व वाल ४०, मटार ३०, भेंडी ६०, सिमला मिरची ४०, चवळीची शेंग ४०, कोबी व फ्लॉवर २०, श्रावण घेवडा ६०-८०, मेथी १५ रुपये जुडी, पालक १० रुपये जुडी, कांदापात १० रुपये जुडी, कोथिंबीर ५० रुपये, हिरवी मिरची ४०, आले ८०, लसूण ३०, बटाटा २०, कांदा १५ रुपये, याप्रमाणे दर होते. कमी आवक याप्रमाणेच दरवाढ होण्यामागे भाजीपाला शहरात येण्यासाठी होणारा खर्च, पेट्रोल व डिझेलचे वाढलेले भाव हे कारणही दिले जात आहे. काही दिवसांपासून दर वाढत असल्याने अनेक महिलांनी कडधान्याकडे आपला मोर्चा वळविला आहे.