विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने राहुरी येथे आयोजित करण्यात आलेल्या अकराव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन दि. १९ ला डॉ. बसविलग पट्टदेवरू यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. बाबुराव गुरव आहेत. चळवळीचे अध्यक्ष पार्थ पोळके यांच्या उपस्थितीत दोन दिवस हे संमेलन चालणार आहे.
राहुरी येथील संत गाडगेबाबा आश्रमशाळेत हे संमेलन होणार आहे. संमेलनस्थळाचे नामकरण संत गाडगेबाबा साहित्यनगरी व व्यासपीठाचे नामकरण फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच असे करण्यात आले आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. जालिंदर घिगे यांनी दिली. माजी संमेलनाध्यक्ष राजा शिरगुप्पे हेही उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
पहिल्या दिवशी (शनिवार) दुपारी ३ ते ५ या वेळेत ‘भारतीय स्त्री समतेच्या ऐतिहासिक संघर्षांचा वारसा आणि भवितव्य..’ या विषयावर नूतन माळवी यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. सायंकाळी कॉ. वाहरू सोनवणे व त्यांचे सहकारी आदिवासी स्त्रीगीते सादर करणार आहेत. त्यानंतर रात्री प्रा. संतोष पवार यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे.
दुसऱ्या दिवशी (रविवार) सकाळी विद्रोही शाहिरी जलसा होणार आहे. बालमेळावा व त्यानंतर ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचे दिग्दर्शक नंदू माधव, लेखक राजकुमार तांगडे व संभाजी भगत यांची मुलाखत होणार आहे. दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली ‘जातीअंताचा लढा: ऐतिहासिक लढा व पुढील दिशा’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. दुपारी प्रसेनजीत गायकवाड, अनिस शेख व देवदत्त हुसळे यांचे कथाकथन, विविध चार विषयांवर गटचर्चा व सायंकाळी एकनाथ आव्हाड, हनुमंत उपरे व कॉ. धनाजी गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचा समारोप होईल, याचवेळी ठराव वाचन व यशवंत मनोहर यांचे आभाराचे भाषण, संमेलनाध्यक्ष गुरव यांचे भाषण होईल. संमेलनात नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.