कळंबोली येथील सेंट जोसेफ विद्यालयातील विद्यार्थी विघ्नेश साळुंके याचा शुक्रवारी शाळा सुरू झाल्यावर इमारतीवरून पडून संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेला तीन दिवस उलटले तरीही विघ्नेशच्या मृत्यूला वाचा फुटली नाही. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी कळंबोली पोलिसांनी तीन विविध पथकांची स्थापना केली आहे.
शुक्रवारी विघ्नेशला शाळेच्या प्रवेशद्वारावर वडिलांनी सोडले, मात्र तो पाचव्या मजल्यावरील आपल्या वर्गात न जाता त्याने थेट शाळेच्या इमारतीच्या छतावरून उडी मारल्याच्या घटनेने कळंबोलीसह तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेला हादरा बसला आहे. नेमके विघ्नेशने असे का केले, हा प्रश्न अनुत्तरित आहे, मात्र शाळेने प्रसारमाध्यमांना दाखविलेल्या शाळेच्या चित्रफितीमध्ये विघ्नेश छतावर जाण्यापूर्वी पाठीमागे वळून पाहत आहे, त्यामुळे विघ्नेशचा कोण पाठलाग करत होते का, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. पोलिसांना वाटणारी दुसरी शक्यता ही शाळेतील कारभाराबद्दल आहे. विघ्नेशने शाळेतील कोणत्या ताणामुळे हे पाऊल उचलले आहे का, याबाबतही पोलीस चौकशी करत आहेत. विघ्नेशच्या मृत्यूच्या कारणाभोवती त्याच्या कुटुंबातून कोणता दबाव त्याच्यावर होता का, याचाही शोध पोलीस घेत आहेत. या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोहिते हे करीत आहेत.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी रमजान ईदची सार्वजनिक सुटी, त्यानंतर रविवारची सुटी त्यामुळे सेंट जोसेफ विद्यालय सुरू होण्यासाठी सोमवार उजाडला. स्थानिक पालक व राजकीय नेत्यांनी विघ्नेशच्या मृत्यूबद्दल शाळेला जाब विचारण्याची तयार दर्शविल्याने पोलीस बंदोबस्तामध्ये हे विद्यालय सुरू करण्यात आले. शाळेबाहेरील रस्त्यावर उभा असणारा पोलिसांचा पिंजरा हे त्याचे प्रतिबिंब आहे. विद्यालयातील इतर विद्यार्थ्यांना सामाजिक व राजकीय संघटनांचा फटका बसू नये म्हणून सुरक्षेसाठी हे पाऊल पोलिसांनी उचलले आहे. विघ्नेशच्या मृत्यूचा छडा लावण्यासाठी सेंट जोसेफ विद्यालयाचे शिक्षक व कर्मचाऱ्यांसह त्याच्या मित्रांकडे पोलिसांनी चौकशीचे सत्र सुरू केले आहे. विघ्नेशचे वर्गात कोणाशी भांडण झाले होते का, याबाबत पोलीस माहिती मिळवीत आहेत.  मात्र, विघ्नेशने आत्महत्या केली नसल्याचे त्याच्या वडिलांनी पोलिसांना ठणकावून सांगितले.
९० टक्केहून अधिक गुण मिळविणारा विघ्नेश हा वर्गाचा प्रतिनिधी होता. तो शाळेतील प्रत्येक खेळात व सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभाग नोंदवत असे. त्यामुळे तो सर्वाचा आवडता विद्यार्थी होता. त्यामुळे मागील वर्षांसाठी त्याला उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून गौरविण्यात आले. शाळेसह तो आजोबांचा आवडता नातू होता. नुकतेच त्याच्या आजोबांचे निधन झाले. स्वहस्ताक्षरात विघ्नेशने शाळेचा रजेचा अर्ज लिहिला होता. या रजेच्या सुटीनंतर तो गुरुवारी नेहमीप्रमाणे शाळेत हजर झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी त्याला असे का करावे लागले याचा शोध पोलीस घेत आहेत. गुरुवारी शाळेत विघ्नेशच्या एकूण हालचालींचे सीसीटीव्ही कॅमेरातील चित्रीकरण पोलीस तपासत आहेत.