जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी गेल्या दीड वर्षांत टोलवाटोलवी करत केवळ वेळकाढूपणा केला, सदस्यांची कामे मार्गी लागत नाहीत, पदाधिकारी-अधिकारी दालनात उपस्थित राहात नसल्याने जनतेच्या समस्या कोणापुढे मांडायच्या याचा प्रश्न सदस्यांना जाणवतो. येत्या आठवडाभरात यात सुधारणा झाली नाही तर पुढील मंगळवारी अध्यक्षांच्या दालनास काँग्रेसच्या सदस्यांना टाळे ठोकावे लागेल, असा इशारा सदस्य व माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी दिला.
अध्यक्षांच्या दालनातच पत्रकारांशी बोलताना शेलार यांनी हा इशारा दिला. या वेळी काँग्रेसचे सदस्य बाळासाहेब हराळ व राहुल जगताप उपस्थित होते. नागरिकांना भेटण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीत मंगळवारचा दिवस राखून ठेवला गेला असतानाही बहुसंख्य पदाधिकारी व अधिकारी अनुपस्थित आहेत, याकडे शेलार यांनी लक्ष वेधताना ८ कोटी रुपये खर्चून उभारलेली इमारत केवळ शोभेसाठी आहे का, असा प्रश्नही केला.
दुष्काळ निवारणाची मोठी संधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असताना लंघे यांनी केवळ चर्चेत वेळ घालवून कच खाल्ली, गेल्या दीड वर्षांत एकही ठोस काम उभे राहिले नाही, कोणत्या कामासाठी प्रयत्न करून निधी आणला नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असूनही त्याच पक्षाच्या सदस्यांची कामे होत नाहीत तर विरोधी सदस्यांची कामे कशी मार्गी लागणार? कोणताही प्रश्न उपस्थित केला, की त्यावर केवळ वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले गेले, अशी टीका शेलार यांनी केली.
शाळा खोल्यांचा राहिलेला ५ टक्क्यांचा निधी वारंवार उपस्थित करूनही व नाशिक पॅकेजचा उर्वरित निधी मिळवण्यासाठी प्रयत्न झाला नाही, याकडे हराळ यांनी लक्ष वेधले.