News Flash

चाऱ्यासाठी साखर कारखाने बंद पाडू- गाडे

जनावरांच्या छावण्यांमधील चारा अनुदानात कपात केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नगर जिल्ह्य़ाच्या दौऱ्यात काळे झेंडे दाखवून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाप्रमुख शशिकांत

| January 17, 2013 03:55 am

अनुदान कपातीचा निषेध
जनावरांच्या छावण्यांमधील चारा अनुदानात कपात केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नगर जिल्ह्य़ाच्या दौऱ्यात काळे झेंडे दाखवून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी दिला. जनावरांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी जिल्ह्य़ातील सर्व साखर कारखाने ६ फेब्रुवारीनंतर बंद पाडण्याचे आंदोलनही त्यांनी जाहीर केले.
पत्रकारांशी दुष्काळाबाबत बोलताना गाडे यांनी सांगितले की सरकारमध्ये साखर कारखानदारांचे वर्चस्व आहे. त्यांना कारखान्यांचे गाळप पूर्ण करून घ्यायचे आहे. त्यासाठी जनावरांच्या छावण्यांना उसाचा चारा देणे बंद व्हायला पाहिजे. तसे व्हावे यासाठीच त्यांनी चारा अनुदान ८० रूपयांवरून ६० रूपये केले. त्यातून छावण्या बंद होतील व कारखाने सुरू राहतील. पण शिवसेना असे होऊ देणार नाही. ६ फेब्रुवारीनंतर जिल्ह्य़ात एकही कारखाना सुरू राहू देणार नाही, असे गाडे म्हणाले. जिल्हा उपप्रमुख राजेंद्र दळवी, राजेंद्र कदम, संदेश कार्ले, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सुजाता कदम, तसेच अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
शिवसैनिक कारखान्यांकडे जाणारे उसाचे ट्रक अडवून त्यांची हवा सोडतील, असे त्यांनी जाहीर केले. जिल्ह्य़ात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना जिल्ह्य़ातील तिन्ही मंत्री मात्र त्याबाबत गंभीर नाहीत, असा आरोप गाडे यांनी केला. पालकमंत्री पाचपुते यांचे प्रशासनावर वजन नाही, त्यांचे आदेश प्रशासन धाब्यावर बसवत आहे. फिरणे व गप्पा मारणे याशिवाय त्यांना दुसरे काही जमायला तयार नाही, अशी टिका त्यांनी केली. त्यामुळेच जिल्ह्य़ातील दुष्काळी स्थिती बिकट झाली आहे, असे गाडे म्हणाले.
मुळा, भंडारदरा, कुकडी या धरणांमधून आता शेतीसाठी म्हणून एकही आवर्तन सुटणार नाही, म्हणजे पुढचे चार महिने चारा उपलब्ध होणार नाही व त्यानंतरही किमान दोन महिने चारा मिळणार नाही. त्यामुळे कारखाने बंद ठेवून तो ऊस चाऱ्यासाठी वापरणे गरजेचे आहे, असे मत गाडे यांनी व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 3:55 am

Web Title: we will stops the suger factory for grass gade
Next Stories
1 दाम्पत्याला लुटणाऱ्या तिघांना सक्तमजुरी
2 पारनेरमधील १०० गावांची आणेवारी पन्नासपेक्षा कमी
3 पथदिवे तपासणीला विखे कॉलेजचाही नकार
Just Now!
X