सलग दोन वर्षे दुष्काळामुळे व पाण्याचे ऑडिट न झाल्यामुळे तळ गाठलेल्या उजनी धरणात पाण्याची पातळी लक्षणीय स्वरूपात वाढत चालली असून या धरणाने पाण्याच्या मृतसाठय़ाची पातळी ओलांडून उपयुक्त पातळी गाठली आहे. एवढेच नव्हे, तर धरणात पाण्याचा साठा झपाटय़ाने वाढून दोन दिवसात १० टक्के पाणीसाठा झाला आहे.
गुरूवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उजनी धरणात पाण्याची पातळी ४९१.७५२ मीटर तर एकूण पाण्याचा साठा १९५०.५६ दशलक्ष घनमीटर एवढा होता. यात उपयुक्त पाणीसाठा १४७.५६ दलघमी इतका होता. उपयुक्त पाण्याची टक्केवारी १० पर्यंत पोहोचली होती. दरम्यान, दौेंड येथून धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग ६२ हजार क्यसेक्स एवढा वाढला तर त्याचवेळी बंडगार्डन येथून सुमारे ३४ हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचा वाढता विसर्ग पाहता उद्या शुक्रवारी या धरणात पाण्याच्या पातळीत आणखी झपाटय़ाने वाढ होऊन उपयुक्त पाण्याचा साठा १० टक्क्य़ांवरून २० टक्क्य़ांपर्यंत वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात या धरणात वजा ५० टक्के पाणीसाठा होता. परंतु धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह वरील भागात म्हणजे पुणे जिल्ह्य़ात पडत असलेल्या दमदार पावसामुळे उजनी धरणातील पाण्याची परिस्थिती सुधारत गेली. १० जून ते आजतागायत या धरणात मृत साठा विचारात घेता ६० टक्के पाणीसाठा झाला आहे. सध्या धरणात सुमारे ७० टीएमसी पाणीसाठा असल्याचे सूत्रांनी सांगितले. या धरणाची पाणीसाठय़ाची क्षमता ११७ टीएमसी एवढी असून यात ५४ टीएमसी उपयुक्त तर ६३ टीएमसी मृतसाठा समजला जातो. सध्या धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग ६२ हजार क्युसेक्स असून त्यात मुळशी-१२ हजार, पवना-९ हजार, खडकवासला-५८९०, चासकमान-२२००, आंद्रा-२००० क्युसेक्स यांचा समावेश आहे.