संगमनेर तालुका कायम दुष्काळी असून शेतक-यांचे नेहमीच नुकसान झाले आहे. दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या मदतीसाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून तालुक्यातील शेतक-यांना सुमारे ४९ कोटीचे अर्थसाहाय्य केले जाणार आहे. सरकारच्या अनेक चांगल्या योजना असून त्याचा लाभ वंचितांना मिळवून देण्यासाठी युवक व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
महसूल विभागाच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतक-यांना पीक अर्थसाहाय्य धनादेश वाटपाचा शुभारंभ आज येथील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनात थोरात यांच्या हस्ते झाला. आमदार डॉ. सुधीर तांबे अध्यक्षस्थानी होते. कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा आहोळ, सुरेश थोरात, गणेश गुंजाळ, प्रांताधिकारी संदीप निचित, तहसीलदार शरद घोरपडे आदी या वेळी उपस्थित होते.
याप्रसंगी थोरात म्हणाले, की राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होऊनही गेल्या दोन वर्षांपासून संगमनेरात दुष्काळ पडला आहे. दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या मदतीसाठी राज्य व केंद्र सरकारच्या मदतीसाठी फळबागासाठी प्रतिहेक्टर आठ व इतर पिकांसाठी तीन हजार असे ४८ कोटी ८१ लाखाचे अर्थसाहाय्य केले जात आहे. मागील तीन वर्षांत वैयक्तिक लाभाच्या योजनातून ११ हजार लाभार्थ्यांना दरवर्षी नऊ कोटी रुपये दिले गेले. योग्य लाभार्थ्यांस लाभ मिळावा यासाठी राबविण्यात येत असलेली विशेष मोहीम कौतुकास्पद आहे. शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहे. वाडीवस्तीपर्यंत योजना समजावून देत कार्यकर्त्यांनी गरजूंना फायदा मिळवून द्यावा. येत्या दोन महिन्यांत तालुक्यातील सर्व सातबारा उतारे अद्यावत केले जाणार आहे असेही ते म्हणाले.
आमदार डॉ. तांबे यांचेही या वेळी भाषण झाले. निचित यांनी प्रास्ताविक केले. नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन तर घोरपडे यांनी आभार मानले.