जननी सुरक्षा योजनेतंर्गत प्रसुती झालेल्या महिलेला माहेरी सोडून देण्यासाठी जात असलेली रुग्णवाहिका बुलढाणा ते मोताळा मार्गावरील मूर्ती फाटय़ाजवळ अचानक समोर आलेल्या रोहीला धडक देऊन रस्त्याच्या बाजूला उलटून झालेल्या अपघातात या महिलेच्या पंधरा वर्षीय भावासह रोही जागीच ठार झाला, तर चालकांसह महिलेचे आईवडील, असे तीन जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, दैव बलवत्तर म्हणून या अपघातात चार दिवसाच्या बाळाला कुठलीही दुखापत झाली नाही. सर्व जखमींना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
मलकापूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील क ौतीक मोरे (५५) यांना तीन मुली असून एकुलता एक प्रशांत नावाचा मुलगा आहे. दिड दोन वर्षांपूर्वी जयश्री हिचे लग्न कन्नड तालुक्यातील गौरपिंप्री येथील ज्ञानेश्वर सुर्यवंशी यांच्यासोबत झाले होते. पहिले बाळंतपण असल्यामुळे जयश्री माहेरी पिंपळखुटा येथे आली होती. जननी सुरक्षा योजनेतंर्गत प्रसुती करण्यासाठी तिला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बाळंतणानंतर आज ती आपले बाळ, आईवडील व भावासह समान्य रुग्णालयाच्या एम.एच. २८/ एच/५१२६ या क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने माहेरी जात होती. मूर्ती फाटय़ाजवळ येताच अचानक रोही आडवा आल्यामुळे चालक मुसाचे नियंत्रण सुटले. यावेळी रोहीला धडक देऊन रुग्णवाहिका उलटली. या अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने पंधरा वर्षीय प्रशांत मोरे जागीच ठार झाला, तसेच रुग्णवाहिकेची जबर धडक लागल्याने रोहीचाही जागीच मृत्यू झाला, तर चालकासह विवाहित महिलेचे आईवडील जखमी झाले. दैव बलवत्तर म्हणून चार दिवसाच्या बाळाला कुठलीच दुखापत झाली नाही.
अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन रुग्णवाहिकेमध्ये फसलेल्या जखमींना बाहेर काढले. त्यानंतर अपघातातील सर्व जखमींना येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात एकुलता एक मुलगा ठार झाल्यामुळे मोरे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वृत्त लिहीपर्यंत पोलिसात कुठलाच गुन्हा दाखल झाला नव्हता.