न्यायाधीशांच्या संरक्षणार्थ तैनात पोलिसाची गचांडी पकडली

सोलापूरच्या जिल्हा न्यायालयाच्या मुख्य इमारतीच्या आवारात न्यायाधीशांच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या पोलिसाची एका आरोपीने गचांडी पकडून दमदाटी केल्याची घटना घडली.

सोलापूरच्या जिल्हा न्यायालयाच्या मुख्य इमारतीच्या आवारात न्यायाधीशांच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या पोलिसाची एका आरोपीने गचांडी पकडून दमदाटी केल्याची घटना घडली. त्याच्याविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
प्रवीण दगडू माने (वय २०, रा. बुधवार पेठ, सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात पोलीस शिपाई साकीब काझी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काझी हे अतिरिक्त सत्र न्यायाधीश शब्बीर अहमद औटी यांचे संरक्षक म्हणून सेवेत आहेत. दुपारी साडेबाराच्या सुमारास ते न्यायाधीशांसोबत न्यायालयात आले. न्यायालयीन कामकाज सुरू झाल्यानंतर काझी हे न्यायकक्षाच्या बाहेर पहारा देत असताना त्याठिकाणी एका खटल्यात तारखेला आलेला आरोपी प्रवीण माने हा जोरजोरात बोलत होता. त्यावेळी काझी यांनी हरकत घेऊन त्यास शांत बसण्यास सांगितले. तेव्हा  रागाच्या भरात आरोपी प्रवीण याने, तू मला ओळखत नाहीस काय, मी कोण आहे हे तुला माहीत नाही, तू कोण सांगणार, तुझ्या अंगावरची वर्दी उतरवीन, अशा शब्दांत दमबाजी केली. एवढेच नव्हे तर त्याने पोलीस शिपाई काझी यांची गचुंडी पकडून शर्टाचा खिसा फाडला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल दबडे हे न्यायालयाच्या आवारात धावून आले. परंतु तोपर्यंत प्रवीण माने याने धूम ठोकली. त्याचा शोध घेतला जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Accused attacking police