उत्तराखंडातील जलप्रलयात जिल्ह्य़ातील १२४ यात्रेकरू अडकले असले तरी ते सर्व सुखरूप असून आजच सकाळी हे सर्व यात्रेकरू गौरीकुंड या सुरक्षित ठिकाणी पोहोचले आहेत. यातील दहा यात्रेकरू वगळता सर्व यात्रेकरूंशी संपर्क झाल्याचाही माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
उत्तराखंडातील ढगफुटीमुळे आलेल्या जलप्रलयात देशभरातील यात्रेकरू अडकले आहेत. त्यात जिल्ह्य़ातील १२४ यात्रेकरूंचा समावेश आहे. या यात्रेकरूंच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने नगरला जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष स्थापन केल्यानंतर उत्तराखंडात गेलेल्या जिल्ह्य़ातील यात्रेकरूंचा निश्चित आकडा स्पष्ट झाला आहे. तालुका स्तरावरून ही माहिती येथे संकलीत करण्यात आली आहे.
जिल्ह्य़ातून दरवर्षी अनेक यात्रेकरू केदारनाथ व अन्य धार्मिक स्थळांच्या ठिकाणी दर्शनासाठी जातात. जिल्ह्य़ातील व बाहेरील यात्रा कंपन्यांबरोबरच स्वतंत्रपणेही भाविक ही यात्रा करतात. पारंपरिक वेळापत्रकानुसार या प्रदेशात साधारणपणे जुलैच्या मध्यानंतर पावसाला सुरुवात होते. त्यानुसारच या सहलींचे आयोजन केले जाते. मात्र यंदा त्या भागात महिनाभर आधीच मान्सून दाखल झाला, त्यात ढगफुटीसारखी घटना घडल्याने हाहाकार उडाला आहे. नगर जिल्ह्य़ातून किती भाविक तिकडे गेले याचा निश्चित अंदाजच गेले दोन, तीन दिवस येत नव्हता. मात्र जिल्हा स्तरावर आपत्कालीन कक्ष स्थापन केल्यानंतर ब-यापैकी माहिती संकलित झाली आहे. या कक्षातूनच जिल्ह्य़ातील १२४ भाविक या यात्रेला गेले असल्याची माहिती देण्यात आली.
हे सर्व यात्रेकरू सुखरूप असल्याचे या कक्षातून सांगण्यात आले. वेगवेगळ्या यात्रा कंपन्यांमार्फत हे यात्रेकरू गेले असले तरी तेथील मदत कार्यामुळे हे यात्रेकरू आज गौरीकुंड येथे एकत्र आले आहेत. सुरक्षित ठिकाणी ते पोहोचले असल्याची माहिती या कक्षातून देण्यात आली. या सर्वाशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाल्याचेही सांगण्यात आले. स्वतंत्ररीत्या यात्रेला गेलेल्या श्रीरामपूर येथील दहा भाविकांशी संपर्क होऊ शकला नाही, मात्र तेही सुखरूप असल्याची माहिती या कक्षाकडे आल्याचेही सांगण्यात आले. नगर शहर- १०, नेवासे (चांदा)- ११, पाथर्डी- १०, श्रीरामपूर- १०, कोपरगाव- २४ आणि श्रीगोंदे- ५७ याप्रमाणे जिल्ह्य़ातील यात्रेकरू उत्तराखंडात अडकले आहेत, सुदैवाने ते सर्व सुखरूप आहेत आणि सुरक्षित ठिकाणी पोहाचले आहेत अशी माहिती या कक्षातून देण्यात आली. या कक्षाचा टोलफ्री दूरध्वनी क्रमांक (०२४१) १०७७ व (०२४१) २३२३८४४, २३४३६०० असे क्रमांक त्यासाठी कार्यान्वित करण्यात आले आहेत. यात्रेकरूंचे नातेवाईक अथवा अन्य नागरिकांनी येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी केले आहे.
श्रीरामपूर शहरातील अंबिका ट्रॅव्हल्सचे मालक आनंद कुलकर्णी, शीतल कुलकर्णी व त्यांचा मुलगा शेखर कुलकर्णी हे शहरातील २० कर्मचा-यांसह मराठवाडय़ातील १०० भाविकांना घेऊन केदारनाथला गेले होते. ते गौरीकुंडानजीक अडकून पडले. त्यांचा चार दिवसांपासून संपर्क झाला नसल्याचे धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. मात्र यात्रेसोबत गेलेले आचारी नंदू शिंदे यांनी नातेवाइकांना दूरध्वनी करून आम्ही सुरक्षित असल्याचे सांगितले.