अनेक दिवसांपासून टंचाईचा सामना करणाऱ्या मनमाडकरांसाठी अखेर पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. शहराला पाणीपुरवठा करणारे वाघदर्डी धरण कोरडे पडल्यामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पालखेड डाव्या कालव्यातून शहरासाठी सोडण्यात आलेले पाणी रविवारी सकाळी येवला तालुक्यातील पाटोदा येथील पालिकेच्या साठवणूक तलावात आले. वाघदर्डी धरणात हे पाणी आल्यानंतर नियोजनाप्रमाणे शहरात पाणीपुरवठा करण्यात येईल. दरम्यान, शहरासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्यामुळे नगराध्यक्ष राजेंद्र पगारे यांनी पाटोदा साठवणूक तलावाजवळील मोटारींची व तलावाची पाहणी केली. या मार्गावर आडगावजवळ वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाटोदा ते वाघडर्दी धरणापर्यंत टाकण्यात येणाऱ्या नवीन जलवाहिनी कामाचीही पाहणी केली. या वेळी गटनेते बब्बुभाई कुरेशी, धनंजय कमोदकर, गौतम संचेती त्यांच्या समवेत होते. शहराला पंधरा ते सोळा दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आणखी तीन दिवस लांबल्यामुळे महिलांची मोठय़ा प्रमाणावर तारांबळ उडाली आहे. मुळात घरातील पाणीसाठा संपला आहे. त्यामुळे पुन्हा तीन दिवसांसाठी पाणी आणणार कुठून, असा प्रश्न महिलांसमोर उपस्थित झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक खासगी कुपनलिकांवर पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी दिसून आली.
दर ४५ दिवसांनी पालखेड धरणातून कालव्याद्वारे पाटोदा येथील साठवणूक तलावात आवर्तनाचे पाणी घेऊन ते शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणात १६ किलोमीटर पाइपमधून आणले जाते. त्यानंतर शहरात वितरित केले जाते. त्या पाण्यावरच मनमाडकरांची आठ-नऊ महिन्यांची तहान भागणार आहे. या पाश्र्वभूमीवर केव्हा एकदा पालखेडचे आवर्तन सुटते, याकडे सर्वाचे लक्ष लागून होते.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allotment for manmad from palkhed
First published on: 25-12-2012 at 01:46 IST