करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात होणाऱ्या अनाठायी व मनमानी बांधकामामुळे मंदिराच्या मूळच्या सौंदर्याला बाधा येत असल्याच्या पाश्र्वभूमीवर बुधवारी पुरातत्त्व व नगरसंचालक खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंदिराची पाहणी केली. या वेळी दिसून आलेल्या घटनांच्या तपशीलाचा अहवाल ३ जानेवारीला जिल्हाधिकारी राजाराम माने यांना देण्यात येणार असल्याचे पाहणी केलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
महालक्ष्मी मंदिराचे मूळचे बांधकाम हे कमालीचे सौंदर्यपूर्ण आहे. महालक्ष्मी बरोबरच मंदिर परिसरात अनेक देव-देवतांची लहान-मोठी मंदिरे बांधण्यात आली आहेत. ती बांधत असतांना त्यावर कोणाचे नियंत्रण राहिले नाही. परिणामी मंदिराचे मूळच्या सौंदर्याला गालबोट लागत राहिले. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावंत, हेमंत कुलकर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. तब्बल ९ वर्षांनंतर या तक्रारीची सुनावणी झाली. गेल्या आठवडय़ात जिल्हाधिकारी माने यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मंदिराची पाहणी करून अहवाल द्यावा, असा आदेश दिला होता.
त्यानुसार पुरातत्त्व व नगरसंचालक खात्याचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते त्यांचे वकील, देवस्थान समितीचे अधिकारी यांनी आज महालक्ष्मी मंदिराची पाहणी केली. यामध्ये पुरातत्त्व खात्याचे सहायक संचालक व्यंकटेश कांबळे, पुणे येथील नगरसंचालक विलास वाहने, पुरातत्त्व विभागाचे कोल्हापूरचे सहायक संचालक उत्तम कांबळे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अॅड.पवार, तक्रारदार प्रमोद सावंत, हेमंत कुलकर्णी, अॅड.नरेंद्र गांधी, चंद्रकांत पाटील, प्रसन्न मानेकर, मंदिराचे अभ्यासक उमाकांत रानंगा यांनी मंदिराची पाहणी केली.
सावंत व कुलकर्णी यांनी मंदिर परिसरात कोठे कोठे अनावश्यक बांधकाम झाले आहे, या संदर्भातील माहिती दिली. त्याच्या नोंदी अधिकाऱ्यांनी घेतल्या. या संदर्भातील सविस्तर अहवाल ३ जानेवारीला जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे पत्रकारांना सांगण्यात आले.