मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने मेट्रो रेल्वेच्या स्थानकांभोवतीचा परिसर सुसज्ज करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केल्यानंतर आता मोनोरेलच्या चेंबूर ते वडाळा या पहिला टप्प्यातील मार्गावरील स्थानकांभवतीचा परिसर सज्ज करण्याची योजना आखली आहे.
चेंबूर-वडाळा-संत गाडगेमहाराज चौका या २० किलोमीटर लांबीच्या मार्गावर मोनोरेलचे काम सुरू आहे. या प्रकल्पाचा खर्च सुमारे २३०० कोटी रुपये असून त्यापैकी चेंबूर-वडाळा हा ८.८ किलोमीटरचा पहिला टप्पा ऑगस्ट-सप्टेंबर २०१३ मध्ये वाहतुकीसाठी सुरू करण्याचे नियोजन आहे. या मार्गावर चेंबूर वडाळासह भक्तीपार्क, म्हैसूर कॉलनी, व्हीएन पुरव मार्ग, आरसीएफ वसाहत आणि आरसी मार्ग अशी सात स्थानके आहेत.
मोनोरेल सुरू होताना या मार्गावरील स्थानकांचा परिसर प्रवाशांसाठी ये-जा करण्यासाठी सुसज्ज राहावा अशारितीने स्थानक परिसर मोकळा केला जाणार अहे. त्यासाठी अतिक्रमण काढणे, प्रवाशांना ये-जा करण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे, मार्गदर्शक फलक लावणे आदी कामे केली जाणार आहेत. यासाठी सुमारे १६ कोटी रुपये खर्च येईल असा अंदाज आहे.
स्थानकांबाहेर शक्य तेथे दुचाकी वाहनांसाठी वाहनळही उभारला जाणार आहे. त्याचबरोबर बस स्थानके या स्थानकांजवळच असतील अशी व्यवस्था करण्यासाठी ‘बेस्ट’सोबत बोलणी सुरू आहेत. चेंबूर ते वडाळा या सुमारे नऊ किलोमीटरच्या प्रवासासाठी सध्या प्रवाशांना खड्डेमय रस्ते आणि वाहतूक कोंडीतून वाट काढणाऱ्या बसमधून तब्बल ४० मिनिटे प्रवास करावा लागतो. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच दमछाक होते आणि रस्त्यावरील गोंगाटही सहन करावा लागतो. पण चार डब्यांच्या मोनोरेलमध्ये वातानुकूलित वातावरणात अवघ्या १९ मिनिटांत हे अंतर कापता येईल. मोनोरेलच्या सध्या चाचण्या सुरू असून रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून परवानगी मिळाल्यावरच ही सेवा सुरू होणार आहे.