सर्वात आधी शिवसेना, मग काँग्रेस, नंतर राष्ट्रवादी, पुन्हा शिवसेना आणि त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी.. ठरवून प्यादी हलवावी तसा महापालिकेतील सत्तेचा पट एखाद्या रचित कथानकासारखा बदलतो आहे. या वेळी तर काँग्रेस आघाडीने अगदी सहजगत्या परिवर्तन घडवून आणले. मात्र आता खरंचच नगर विकास हाच ध्यास राहील की नाही, हे आगामी काळातच दिसेल. यंदा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनाही काँग्रेस आघाडीने मैदानात उतरवले, त्यांनीही युतीच्या विशेषत: शिवसेनेच्या निष्क्रिय नेतृत्वाला लाखोली वाहात नगरकरांसमोर विकासाचे चित्र रंगवले, आता त्याला ते आणि स्थानिक पदाधिकारीही जागणार की नाही याकडे नगरकरांचे बारीक लक्ष राहील!
मनपाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीने २९ जागा मिळवत पहिली लढाई जिंकली होतीच, आता महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसह मनपात सत्तापरिवर्तन करून मानाचा झेंडाही रोवला. १८ जागा जिंकून राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष ठरला. काँग्रेसला मात्र ११ जागांवरच समाधान मानावे लागले. मनपा निवडणूक आणि पुढच्या सत्तास्पर्धेत भाजप-शिवसेना युतीचा पराभव झाला असला तरी काँग्रेस आघाडीने फार मोठा तीर मारला असेही नाही. एका बंडखोर अपक्षाला बरोबर घेत शिवसेनेने १८चे संख्याबळ गाठले असून, मागच्या तुलनेत त्यांची एकच जागा कमी झाली आहे. कमी-अधिक फरकाने भाजपचीही हीच स्थिती आहे. एका पुरस्कृत अपक्षासह त्यांचे संख्याबळ आता १० झाले असून, मागच्या तुलनेत त्यांच्या दोन जागा कमी झाल्या आहेत. या जागा कमी होण्यासही काँग्रेस आघाडी कारणीभूत आहे असे नाही, आपसातील बेदिलीनेच त्यांनी स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. तुलनेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चमकदार कामगिरी केली. त्यांचे संख्याबळ दुप्पट होऊन चारवर गेले, मात्र त्यांनाही अपेक्षित यश मिळालेले नाही.
नगरकरांनी कोणालाही एकाला झुकते माप दिलेले नाही किंवा कोणाला फार दूरही केले नाही, हेच या निकालाचे वैशिष्टय़ आहे. जागावाटपापासून ते उमेदवारी वाटप आणि पुढे प्रत्यक्ष प्रचार या महत्त्वाच्या टप्प्यातच भाजप-शिवसेना युतीने कमालीची बेदिली केली. या दोन्ही मित्रपक्षांची लढाई विरोधी काँग्रेस आघाडीशी होती, की परस्परांशी होती हेही लक्षात येऊ नये एवढा गोंधळ दोघांनी घातला. कारणे काहीही असतील यात कोणीच मागे नव्हते. याला झाकावे आणि त्याला काढावे अशीच स्थिती शेवटपर्यंत होती. एकतर सहा-सात जागांवर युतीला उमेदवारच देता आले नाहीत. काहीही न करता हा काँग्रेस आघाडीचा पहिला विजय होता. सहा जागांवर त्यांचे बंडखोर उमेदवार रिंगणात उतरले होते. यातील दोन जागा त्यांना घालवाव्या लागल्या. बेदिलीमुळे निर्माण झालेली ही तांत्रिक स्थिती होती, याशिवाय खरी आफत ओढवली ती, या दोघांनी कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळत परस्परांची यथेच्छ निंदानालस्ती केली. त्याचा परिणाम निवडणुकीच्या वातावरणावर झाला.
आमदार अनिल राठोड विरुद्ध भाजपचे शहराध्यक्ष अभय आगरकर, आमदार कर्डिले, खासदार दिलीप गांधी असे चित्र ऐन प्रचाराच्या टप्प्यातच ठळकपणे लोकांसमोर आले. राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे व अन्य नेत्यांनीही राठोड यांनाच लक्ष्य केले. त्याचीच परिणती विक्रम राठोड यांच्या पराभवात झाली. राठोड यांना हा मोठा धक्का होता. केवळ त्यांचेच चिरंजीव नव्हेतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या चिरंजीवांनाही बंडखोरीमुळे पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेनेच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या असलेल्या या दोन जागा त्यांना गमवाव्या लागल्या हे लक्षात घेतले पाहिजे.
एवढे सगळे होऊनही पक्षीय पातळीवर जागांच्या तुलनेत भाजप-शिवसेना युतीचे फारसे नुकसान झालेले नाही, हेही काँग्रेस आघाडीला व राठोड विरोधकांनी लक्षात घेतले पाहिजे. तुटेपर्यंत ताणूनही युतीच्या तीनच जागा कमी झाल्या असून, दुसऱ्या बाजूला आघाडीचे वातावरण शेवटपर्यंत टिकवून ठेवूनही काँग्रेस आघाडीच्या तीनच जागा वाढल्या, याचा विचारही त्यांना करावा लागेल. परस्परात कितीही बेदिली माजली तरी शहरावर युतीचा विशेषत: शिवसेनेचा पगडा अजूनही टिकून आहे, याचेच हे द्योतक आहे.
निवडणूक प्रचारात मित्रपक्षासह सर्वानीच राठोड यांना घेरले होते हे खरे असले तरी त्याला कारणही ते स्वत:च आहेत. विशेषत: काँग्रेस आघाडीने त्यांची २५ वर्षांची आमदारकी आणि दहा वर्षांत मिळून असलेली पाच वर्षांची मनपाची सत्ता निष्क्रिय आहे यावरच मोठा भर दिला. लोकांवर त्याचा किती परिणाम झाला, हे तरीही निश्चितपणे सांगायचे तर कठीण होईल, मात्र या सगळय़ा गोष्टींवर राठोड यांच्याकडेच कोणतेच समर्पक उत्तर नाही, हे या निवडणुकीत अधिक ठळकपणे पुढे आले. विकासाबाबत त्यांच्या मनात असलेल्या संकल्पनेने त्यांचेच हसू होते, हे आता तरी त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
पक्षाच्या श्रेष्ठींना नगरच्या प्रचारात उतरवून काँग्रेस आघाडीने नेमके त्यावरच बोट ठेवले. केवळ जागावाटप आाणि उमेदवारी वाटपच नव्हेतर काँग्रेस आघाडीने एकूणच निवडणूक एकसंघपणे लढवली हे मान्यच करावे लागेल. निवडणुकीच्या निकालानंतर मात्र दोन्ही काँग्रेसमध्ये व राष्ट्रवादीतही फारसे आलबेल नव्हते हे लोकांसमोर आले, मात्र तोपर्यंत मतदान होऊन गेले होते. त्यांच्यातील कुरघोडय़ांच्या ज्या काही दोन, चार गोष्टी होत्या त्या निकालामुळे बाहेर आल्या हे लक्षात घेतले पोहिजे. त्यादृष्टीने विनीत पाऊलबुद्धे, सुभाष लोंढे, धनंजय जाधव यांच्या पराभवाची उदाहरणे देता येतील, मात्र या गोष्टी मतदानाआधी चव्हाटय़ावर आल्या नाहीत, हीच त्यांची जमेची बाजू आहे.
आता प्रश्न एवढाच आहे की, पुढे काय? मागच्या दहा वर्षांतील मनपाचा एकूणच प्रवास आणि शहराची अवस्था लक्षात घेता, उडदामाजी काळे गोरे असाच सारा प्रकार आहे. त्याला अपवादही आहे. मात्र या प्रतिमेला धक्का देण्याची मानसिकता काँग्रेस आघाडीने यंदा निदान प्रचारात तरी दाखवली. जिल्हय़ातील मंत्र्यांनी नगरकरांना सत्तेच्या मोबदल्यात विकासाची मोठी स्वप्ने तर दाखवलीच, मात्र शहर विकासाच्या थेट चाव्या असलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही मैदानात उतरवून या स्वप्नांना आणखी रंगतदार करण्यातही काँग्रेस आघाडीला बऱ्यापैकी यश आले. नगर विकास खाते मुख्यमंत्र्यांकडे आणि अर्थ खाते उपमुख्यमंत्र्यांकडे, या दोघांनी नगरला येऊन सत्तेसाठी नगरकरांच्या पुढे पदर पसरताना या दोन खात्यांच्या माध्यमातून नगरकरांच्याही झोळीत भरभरून दान टाकण्याची ग्वाही दिली आहे. त्याला ते दोघे आणि त्यांना हा ‘फिडबॅक’ देणारे जिल्हय़ातील व शहरातील नेते कसे जागतात, यावर यापुढील राजकीय प्रवासाची दिशी ठरेल. ऐन तारुण्यात दुस-यांदा महापौरपदाची संधी मिळालेल्या संग्राम जगताप यांच्या खांद्यावर आता त्याचेच ओझे आहे, हे ते कसे पेलतात याकडेच नगरकरांचे बारीक लक्ष राहील, कारण हा आता केवळ त्यांच्या एकटय़ाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न राहिलेला नाही, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचीही विश्वासार्हता त्याला जोडली गेली आहे.