जिल्हाधिकारीपदावरून सुनील केंद्रेकर यांची बदली केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी विविध पक्षसंघटनांच्या कार्यकर्त्यांनी कडकडीत ‘बंद’ पाळला. जिल्हाभरात ठिकठिकाणी व्यापारी पेठा बंद करण्यात आल्या. चौसाळा येथे १०१ कार्यकर्त्यांनी मुंडण करून निषेध नोंदवला. शहरात निघालेल्या मोर्चात कार्यकर्त्यांनी ‘परत या.. परत या..केंद्रेकर परत या..’ अशा घोषणा देत शहर दणाणून सोडले.
केंद्रेकर यांची अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने गुरुवारी बदली करण्यात आली. तात्काळ नवीन जिल्हाधिकारी म्हणून नवलकिशोर राम यांना पदभारही देण्यात आला. पावणेदोन वर्षांच्या कार्यकाळात केंद्रेकर यांनी थेट सामान्य माणसाशी संपर्क ठेवून गरव्यवहार, गरधंदे करणाऱ्यांना वठणीवर आणले. त्यामुळे केंद्रेकर अल्पावधीत लोकप्रिय झाले. त्यांची बदली केल्याच्या निषेधार्थ लोक मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरले. सकाळी दहा वाजता शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, गंमत भंडारी, अॅड. अजित देशमुख, जयसिंग चुंगडे, महेश धांडे यांच्यासह विविध पक्षसंघटनांच्या कार्यकर्त्यांनी डॉ. आंबेडकर पुतळय़ापासून ‘बंद’चे आवाहन करीत मोर्चा काढला. सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आवाहनाला प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली. सरकारी कार्यालये व काही तुरळक अत्यावश्यक सेवा वगळता शहरात ‘बंद’ला चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारी मोर्चा सुभाष रस्ता, नगर रस्त्यामाग्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. येथेही कार्यकर्त्यांनी ‘परत या, परत या केंद्रेकर परत या..’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
माजलगाव येथे गंगाभीषण थावरे व बाबुराव पोटभरे यांनी फेरी काढून शहरात ‘बंद’ पाळला. गेवराई, वडवणी येथेही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून सरकारचा निषेध केला.