वकिलांचे करीअर सुरू करण्यासाठी अभिरूप न्यायालय स्पर्धा ही पहिली प्रमुख पायरी आहे. त्यातून चांगले कायदेतज्ज्ञ घडण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश व्ही. जी. पळशीकर यांनी केले.
न्यू लॉ कॉलेजने आयोजित केलेल्या चौथ्या राज्यस्तरीय अभिरूप न्यायालय स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त रामनाथ वाघ होते. स्पर्धेत पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेजचा संघ विजेता ठरला. त्यांना रोख ७ हजार रु., सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. डीईएस लॉ कॉलेजने (पुणे) द्वितीय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजने (धुळे) तृतीय क्रमांक पटकावला.
कायदा क्षेत्रात काम करताना वस्तुस्थिती, मुद्यांचा घटनाक्रम, कायद्याचा सामाजिक दृष्टिकोन, कायद्याचे पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यातूनच कायदा क्षेत्रात यशस्वी काम करता येईल, असे न्या. पळशीकर म्हणाले. प्राचार्य डॉ. ए. एस. राजू यांनी प्रास्ताविक केले. पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. पी. एन. शेळके, बार कौन्सिलचे सदस्य अशोक पाटील, अ‍ॅड. माहेश्वरी ठुबे आदी उपस्थित होते. प्रा. गिरीश हिरडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. प्रियंका खुळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अतुल मोरे यांनी आभार मानले. उपप्राचार्य एम. एस. तांबे, प्रा. एन. पी. मोहिते, विजय शिंदे, प्रभाकर धिरडे, बाळासाहेब पांढरे आदी उपस्थित होते.
छाया ओळी-
न्यू लॉ कॉलेजने आयोजित केलेल्या चौथ्या राज्यस्तरीय अभिरूप न्यायालय स्पर्धेत पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजच्या संघाने विजेतेपद पटकावले. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश व्ही. जी. पळशीकर यांच्या हस्ते त्यांना पारितोषिक देण्यात आले. या वेळी रामनाथ वाघ, प्राचार्य डॉ. ए. एस राजू, अ‍ॅड. अशोक पाटील आदी उपस्थित होते. (छाया- अनिल शहा, नगर)