चंदगड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम शुक्रवारी घोषित करण्यात आला असून रविवारी २४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी निवडणूक होत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राजाराम माने व  उपजिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये चंदगड तालुक्यासह गडहिंग्लज तालुक्यातील काही भागाचा समावेश आहे. सुमारे २ लाख ८५ हजार ९२८ इतके संभाव्य मतदार आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारीअर्ज भरण्याची सुरुवात ३० जानेवारीपासून सुरू होणार आहे. ६ फेब्रुवारी हा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. ९ फेब्रुवारी हा अर्ज माघारीचा अखेरचा दिवस आहे. २४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर मतमोजणी २८ फेब्रुवारीला होणार आहे.गडहिंग्लजचे प्रांताधिकारी विवेक आगवणे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.    दरम्यान या पोट निवडणुकीसाठी आचारसंहिता आजपासूनच लागू झाली आहे. ती संपूर्ण जिल्ह्य़ासाठी असणार आहे. जिल्ह्य़ातील महापौर, नगराध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती यांची वाहने काढून घेण्यात आलेली आहेत, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.