लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मनसे-भाजप यांच्यातील दिलजमाईचे पडसाद ग्रामीण भागातही उमटले. मनसेच्या ‘राज’कीय खेळीने शिवसैनिक हे भाजपपासून दुरावल्याचे चित्र दिंडोरी मतदारसंघात पाहावयास मिळत असून भाजपचे उमेदवार खा. हरिश्चंद्र चव्हाण यांच्या प्रचाराची रुपरेषा ठरविण्यासाठी आयोजित बैठकीत त्याचे प्रत्यंतर दिसून आले.
चव्हाण यांच्या दहा वर्षांच्या खासदारकीच्या कार्यकाळात नजरेत भरण्यासारखे काम झालेले नसले तरी विद्यमान खासदार म्हणून त्यांना तिसऱ्यांदा पक्षाने उमेदवारी दिली. राष्ट्रवादीने डॉ. भारती पवार हा नवीन उमेदवार रिंगणात उतरविला असल्याने निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. राज ठाकरे यांनी मनसेची पहिली यादी जाहीर करताना शिवसेनेच्या उमेदवारांसमोर उमेदवार उभे करून नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्यासाठी पाठिंबा जाहीर केला. मनसे-भाजप जवळिकीमुळे अस्वस्थ झालेल्या शिवसैनिकांनी भाजपपासून अंतर राखण्यास सुरूवात केली. हरिश्चंद्र चव्हाण यांनी प्रचाराची रुपरेषा ठरविण्यासाठी दिंडोरी येथे भाजप व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. त्यास शिवसेनेने उघड विरोध केल्याने भाजपची गोची झाली आहे. दिंडोरी मतदारसंघ भाजपकडे असला तरी शिवसेनेची ताकद त्यांच्यापेक्षा अधिक आहे. याचे भान भाजपच्या पदाधिकाऱ्यांना असले तरी वरिष्ठ पातळीवरील राजकारणाचा फटका येथे बसतो की काय याची भीती स्थानिक कार्यकर्त्यांना आहे. महायुतीतील घटकपक्ष रिपाइंनेही मनसे-भाजपच्या खेळीस विरोध केला आहे.
सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही गटांशी सलोख्याचे संबंध असलेले चव्हाण या संकटातून कसा मार्ग काढतात यावर त्यांचे भविष्य अवलंबून आहे.