खासगी शिक्षण संस्थांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे संस्थाचालकांमध्ये मोठा असंतोष आहे. सरकारने या मागण्यांबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने खासगी शिक्षण संस्थाचालक संघाने येत्या मार्चमध्ये होणाऱ्या शालान्त परीक्षांवर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त परीक्षांना शाळेच्या इमारती व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवर्ग उपलब्ध करून दिला जाणार नाही, अशी भूमिकाही शिक्षण संस्थाचालक संघाने घेतली आहे.
शाळांना देय असलेले २००४ पासूनचे वेतनेतर अनुदान द्यावे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध, विशेष पटपडताळणी मोहिमेच्या आधारे सरकारच्या निर्णयानुसार प्रस्तावित कार्यवाहीबाबत मागण्या पूर्ण न होणे अशा बाबींमुळे शिक्षण संस्थाचालक संघाने असहकार आंदोलन करण्याचे ठरविले आहे.
या दरम्यान परीक्षा मंडळाच्या कामासाठी पर्यवेक्षक, परीक्षक म्हणून शाळेतील कोणतेही कर्मचारी उपलब्ध होऊ शकणार नाहीत, अशी भूमिका घेण्यात आली आहे.
या विषयावर शिवाजीनगरमधील मराठवाडा हायस्कूल येथे मंगळवारी (दि. १५) बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षण संस्थाचालक संघाचे अध्यक्ष प्राचार्य शिवाजी दळणर, चिटणीस विजय जोशी यांनी केले आहे.