मुंबईवर दहशतवादाची टांगती तलवार असल्याचा फटका टाटा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कर्कग्रस्त रुग्णांनाही बसला आहे. गर्दीची ठिकाणे दहशतवाद्यांच्या यादीवर असल्यामुळे पोलिसांनी अशा ठिकाणांवर लक्ष पुरविण्यास सुरुवात केली आहे. टाटा रुग्णालयासमोर तंबू उभारून राहणाऱ्या कर्कग्रस्त रुग्णांना त्यांनी या कारवाईपोटी लक्ष्य केले आहे. पोलिसांच्या या असंवेदनक्षम कारवाई निषेध केला जात असला तरी या रुग्णांच्या सुरक्षेसाठीच आम्ही ही भूमिका घेतल्याचे भोईवाडा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
टाटा इस्पितळात उपचारासाठी राज्यांतून तसेच परराज्यातून दररोज हजारो रुग्ण येतात. मुंबईत हॉटेल सोडाच. परंतु लॉजेस वा घरांचे भाडे परवडत नसल्यामुळे रुग्ण समोरच्या पदपथावर आपली पथारी पसरतात. पावसाळा असल्यामुळे अनेकांनी छोटेखानी तंबू उभारले आहेत. याविरोधात कारवाई करण्याबाबत भोईवाडा पोलिसांनी पालिका अधिकाऱ्यांना पत्र लिहिले. पोलिसांच्या आदेशावरून पालिकेनेही दखल घेत कारवाई सुरू केली. परंतु तरीही रात्रीच्या वेळी पुन्हा तंबू उभे राहत असल्यामुळे पोलिसांनी मध्यरात्री या रुग्णांना तेथून हटविण्यात सुरुवात केली. या कारवाईमुळे कर्कग्रस्त रुग्णांमध्ये पोलिसांबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे.