मकर संक्रांतीदिनी शहरात पतंगप्रेमींनी पतंगोत्सवाचा आनंद लुटला. रंगीबेरंगी पतंगांची आकाशात गर्दी झाली होती. पतंग व मांजाची लाखो रुपयांची उलाढाल नागपुरात झाली. बंदी असूनही नायलॉनच्या मांजाचा सर्रास वापर झाला.
सोमवारी सूर्य उगवत असतानाच पतंगप्रेमींनी आकाशात पतंग उडविणे सुरू केले. लाल, काळा, निळा, हिरवा, गुलाबी रंगाचा मांजा घेऊन पतंगप्रेमींची घराच्या गच्चींवर गर्दी झाली होती. कुठे बच्चे कंपनी, कुठे तरुण तर कुठे वयस्क पतंग उडविताना दिसून आले. मुली, तरुणी व महिलाही त्यात मागे नव्हत्या.   सकाळपासूनच ‘ओ काट’च्या आरोळ्या सुरू झाल्या होत्या. सूर्य माथ्यावर येईपर्यंत आकाशात पतंगांची गर्दी झाली होती. लंगोटदार, गोलदार, चांददार, टोकदार, भांगदार आदी विविध नावांच्या तसेच विविध रंगांच्या पतंगा आकाशात सर्वत्र दिसू लागल्या. ढढ्ढा आणि गिन्नी असा भेदाभेद नव्हता. विविध आकाराच्या पतंगी आकाशात तेवढय़ाच डौलाने, ऐटीत उडत होत्या.
इमारतींच्या गच्चींवर, छतांवर तर रस्ते आणि मैदानातूनही लोक पतंग उडवित होते. अनेक ठिकाणी साथीला मोठय़ा आवाजात डेक लावून त्यावर चित्रपटांची गाणी ऐकली जात होती. आकाशात पतंगांची काटाकाटी सुरू झाली. ‘ढील दे रे’, ‘जाऊ दे सैती सैती’ ‘अबे खिच’ वगैरे संवाद हे प्रत्येकाच्या तोंडी होते. पतंग कापल्यावर आनंदातिरेकाने ‘ओ काट’च्या घोषणा ऐकू येत होत्या. ज्याचा पतंग कापला त्याच्या तोंडी मात्र शिव्याच येत होत्या. पतंग उडविणारा असो की नको, आज सर्वाच्या नजरा आकाशाकडेच होत्या. अस्सल पतंगबाजाच्या नजरेत कटून आलेली आणि हवेत हेलकावणारी पतंग हमखास पडत होती आणि ‘अरे हिलकाव रे तिला’ असे म्हणत ती आपल्या पतंगाच्या मांजाला अडकवण्याचा प्रयत्न होत होता.
पतंग उडविणाऱ्यांसोबतच त्या पकडणाऱ्यांचाही मोठा वर्ग रस्त्यावर होता. झाडाची वाळलेली फांदी वा तारांची गुंडाळी बांधलेला उंच बांबू हातात घेऊन कटून आलेली पतंग वा मांजा पकडण्यासाठी धावणाऱ्यांची संख्याही मोठी होती. त्यांच्या धावण्याने वाहतुकीला अडथळा होत होता. सोमवारी दिवसभर आकाशात पतंगांची गर्दी होती. रंगीबेरंगी पतंगांची आकाशात गर्दी पाहून ‘नभ पतंगांनी आक्रमिले’ असेच शब्द सोमवारी ज्याच्या त्याच्या तोंडी होते. आकाशात दिवसभर पक्षी नव्हे तर रंगीबेरंगी पतंगा दिसत होत्या. दिवसभर पतंगांची कापाकापी व ‘ओ काट’ सुरूच होते. सूर्य मावळतीला गेला तेव्हा पतंग उडविणे थांबले असले तरी आकाशात पतंग उडतच होत्या. तारा, झाडांच्या फांद्यावर पतंग, मांजा अडकलेल्या दिसत होत्या. नायलॉन मांजाचा वापरही यंदा मोठय़ा प्रमाणावर झाला. पतंग व मांजाची लाखो रुपयांची उलाढाल नागपुरात झाली.