भारतीय संविधानाचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना वंदन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभरातून लाखो आंबेडकरभक्तांनी चैत्यभूमीवर गर्दी केली आहे. बाबासाहेबांचे विचार पुढील पिढय़ांपर्यंत पोहोचवणाऱ्या पुस्तकांसह, त्यांची छायाचित्रे असलेली लॉकेट्स, त्यांचे आणि भगवान गौतम बुद्ध यांचे पुतळे, दलित चळवळीतील गाणी, बाबासाहेबांवर आधारित गाण्यांच्या सीडी, निळ्या झेंडय़ाखाली एकवटलेले हजारो लोक यांमुळे चैत्यभूमीवर निळे चैतन्य अवतरल्यासारखे वातावरण होते.
दादर स्थानकापासून चैत्यभूमीपर्यंत जाणारे सवर्च रस्ते बुधवारी सकाळपासूनच गजबजलेले होते. विदर्भ, मराठवाडा तसेच थेट उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यांमधूनही दादरला उतरलेले भीमपुत्र चैत्यभूमीची वाट चालत होते. काही जण मंगळवारी रात्रीपासूनच शिवाजी पार्क भोवतीच्या पदपथावर पथाऱ्या पसरून मुक्कामाला होते.
शिवाजी पार्कवर अनेक पक्षांतर्फे तंबू उभारण्यात आले असून तेथे बुधवारी दुपारी मोफत अन्नछत्र सुरू होते. त्याचप्रमाणे बाबासाहेब व गौतम बुद्ध यांचे पुतळे, मूर्ती, बाबासाहेबांवरील गाणी, त्यांनी लिहिलेली व इतर दलित साहित्यावरील पुस्तके, जपमाळा, मेणबत्ती स्टँड, ब्रेसलेट वगैरे विकणाऱ्या स्टॉल्सचीही गर्दी शिवाजी पार्कमध्ये झाली होती.
चैत्यभूमीवर जमणाऱ्या जनसमुदायाचा विचार करून पालिकेने फिरती शौचालये आणि टँकरद्वारे पाण्याची सोयही केली आहे. आंघोळीच्या पाण्यासाठी पालिकेने तात्पुरती नळजोडणी केली असून प्रत्येक नळजोडणीच्या बाजूला ‘मुंबईतील पाणी टंचाईचा विचार करून पाणी जपून वापरा’, अशा सूचना लिहिलेले फलकही लावले आहेत.    

आमच्या बाबांसाठी आम्ही येतो
बाबासाहेब म्हणजे आमच्यासाठी एक व्यक्ती नाही. ते आमचे दैवत आहेत. त्यांनी दिलेली शिकवण आमच्या समाजासाठी खूप मोठी आहे. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या त्यांच्या मंत्राचे आम्ही पालन करत आहोत. त्यांच्या महापरिनिर्वाण दिनासाठी आम्ही गेली तीन वर्षे मुंबईत येतो. त्यांच्या कर्मभूमीचे दर्शन घेऊन परत गेल्यावर आम्हाला पुढील वर्षांपर्यंत ऊर्जा मिळते. बाबासाहेबांचे विचार आमच्या पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी आम्ही नेहमीच येथे येत राहणार.
शिवाजी सोनावणे,
कोल्हापूर (गवंडी व्यवसाय)

discussion about constitution change is an insult to babasaheb says ramdas athawale
संविधान बदलाची चर्चा हा बाबासाहेबांचा अपमान; रामदास आठवले यांचा आरोप, दलित मोदींच्या पाठीशी असल्याचा दावा 
Prakash Ambedkar Slams PM Modi
पंतप्रधान मोदींच्या हुकूमशाही वृत्तीला कंटाळून १७ लाख कुटुंबांनी देश सोडला, ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आरोपाने खळबळ
Prakash Ambedkar Vijay Wadettiwar
“आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट, त्यामुळे तुम्ही वंचितच्या…”, प्रकाश आंबेडकरांचा विजय वडेट्टीवारांना इशारा
dr babasaheb ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दुर्मीळ पत्रे, लेख यांचे प्रदर्शन

आम्ही देश बदलू शकतो
बाबासाहेब आंबेडकर यांनी आमच्या समाजालाच नाही, तर देशालाही एक नवीन दिशा दिली. त्यांचे कार्य खूप मोठे आहे. तरीही आमचा समाज आज खूप मागे आहे. बाबासाहेबांच्या शिकवणीनुसार आम्ही चाललो, तर आम्ही देशही बदलू शकतो. नेमकी हीच प्रेरणा घेण्यासाठी आम्ही दरवर्षी इथे येतो.
बाळासाहेब धुमाळ, सांगोला (पुजारी)

ही तर आमची श्रद्धा
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाला आम्ही मोठय़ा संख्येने येथे जमतो, कारण आमची त्यांच्यावर श्रद्धा आहे. त्यांना जाऊन पन्नासहून जास्त वर्षे झाली. पण तरीही तेच आमच्या समाजाचे तारक आहेत, असे आजही वाटते. गेली तीन वर्षे मी येथे नेमाने येतो. त्याआधी लहानपणी वडिलांबरोबर आलो असलो, तर आठवत नाही. दरवर्षी येथे हजारो, लाखो लोक येतात. मात्र आमच्या समाजाला अजूनही संघटीत होण्याची गरज आहे, एवढे नक्की.
    युवराज मोरे, येवला (शेतकरी)