पुणे शहराच्या जुन्या हद्दीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखडय़ाबाबत रविवारी (२ डिसेंबर) एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रस्तावित विकास आराखडा आणि नागरिक हित हा या चर्चासत्राचा विषय आहे.
‘सजग नागरिक मंच’तर्फे या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून बीएमसीसी रस्त्यावरील आयएमडीआरच्या सभागृहात रविवारी सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार असल्याचे जुगल राठी यांनी सांगितले.
माजी नगररचना संचालक रामचंद्र गोहाड, तसेच परिसर संस्थेचे रणजित गाडगीळ, सीडीएसएच्या अनिता बेनिंजर, सुराज्य संघर्ष समितीचे विजय कुंभार, सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर आदींचा या चर्चासत्रात सहभाग असेल. विकास आराखडय़ाबाबत शहरात सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. पुढील वीस वर्षांची   शहर   विकासाची  दिशा     या आराखडय़ातून  निश्चित  होणार  आहे. त्यामुळे  प्रस्तावित  विकास  आराखडा या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याचे राठी यांनी सांगितले. चर्चासत्र सर्वासाठी खुले आहे.