मोबाइलचोरांच्या टोळीने येथील रेल्वेस्थानकावर उच्छाद घातला असून, त्यांच्यामुळे नांदेडच्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्थानकावर पोलिसांचा बंदोबस्त असूनही ही घटना घडली. आमचा मुलगा गेला, आता तक्रार करून काय मिळणार, असे सांगून मृत मुलाच्या वडिलांनी फिर्याद दाखल न केल्याने गुन्हेगार मात्र मोकळे सुटले आहेत.
नांदेड येथील महेश हनुमंतराव गळेगाव (वय १८) व सचिन संजय बिराजदार (वय १९) हे दोघे पुणे येथे बी. फार्मसीच्या पहिल्या वर्गात आहेत. नांदेडला जाण्यासाठी रविवारी ते पुणे निजामाबाद या पॅसेंजर गाडीतून प्रवास करीत होते. श्रीरामपूर रेल्वेस्थानकावर ही गाडी बराच वेळ थांबली. त्या वेळी दोघे गाडीतून खाली उतरले. या वेळी चार मोबाइलचोरांनी त्यांच्याशी वाद घातला. मुलीची छेड काढली, मला धक्का का मारला, माझे पाकीट तूच मारले असा बहाणा करून हे मोबाइलचोर प्रवाशांशी वाद घालतात. नंतर त्यांच्याकडील मोबाइल, पैसे काढून घेतात. त्यांना मारहाण करतात. प्रवासी निमूटपणे हे सारे सहन करतात. रेल्वे पोलीस व मोबाइलचोरांमध्ये युती असल्याने तक्रार करून काही उपयोग होत नाही. कालही असाच प्रकार झाला. मोबाइलचोरांनी महेश व सचिनशी वाद घातला. पण दोघे वाद न करता गाडीत जाऊन बसले. महेश हा मोबाइलवर बोलत असताना चोरटय़ांनी त्याच्या हातून तो हिसकावून घेतला. त्यांचा पाठलाग महेशने सुरू केला. रेल्वेच्या भुयारी पुलापर्यंत तो त्यांच्यामागे पळत होता. पुलाजवळ तो एका खांबाला आदळून थेट खाली पडला व जागीच मृत्यू पावला.
महेश पाठलाग करीत असताना गाडी सुरू झाली. त्या वेळी गाडीत बसलेल्या सचिनने खाली उडी मारली. त्यामुळे तोदेखील गंभीर जखमी झाला. त्याच्यावर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत महेश गळेगाव हा एका शिक्षकाचा मुलगा आहे. त्याच्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली नाही. आमचा पोटचा गोळा गेला, आता तक्रार करून काय मिळेल. न्याय कुणाकडे मिळणार. गेलेला जीव पुन्हा येणार नाही असे म्हणत तक्रार न देताच ते निघून गेले. महेशच्या मृत्यूच्या दु:खामुळे त्यांचा आक्रोश बघून सामाजिक कार्यकर्त्यांनाही त्यांना फिर्याद देण्याची गळ घालता आली नाही. पोलिसांनी ही घटना गांभीर्याने न घेता केवळ आकस्मिक मृत्यूची नोंद करून प्रकरण निकाली काढले.