मी सातत्याने चित्रपट करत राहिले. माझ्याकडे कोणतीही भूमिका द्या मी तिचं सोनं करणारच, ही माझी वृत्ती होती. मी आज स्वत:ची अभिनय क्षमता सिध्द केली आहे. म्हणून माझ्यासाठी खास भूमिका लिहिल्या जातात. चित्रपट क्षेत्रात तुमच्यासाठी एखादी भूमिका लिहिली जाते, यापेक्षा यश आणखीन काय असू शकतं..
  
ती नायिका नसते. कुठेतरी नायकाची बहीण, कुठेतरी नायिकेची मैत्रीण..फिल्मी भाषेत सांगायच्या झाल्या तर सहाय्यक भूमिकांची ती नायिका असते. आणि तरीही नायक-नायिकेबरोबर तिचे अस्तित्व जाणवेल, एवढी चोख भूमिका करायची एवढंच तिच्या मनाशी पक्कं असतं. म्हणून, सतत वेगळ्या भूमिकांमधून दिसणारी-जाणवणारी दिव्या दत्ता अगदी श्याम बेनेगलांसारख्या ज्येष्ठ दिग्दर्शकाच्या चित्रपटातही असते. ती यश चोप्रांच्या ‘वीर झारा’तही दिसते आणि मधुर भांडारकरच्या ‘हिरॉईन’मध्येही ती काम करते. ‘माझा पिंड कलाकाराचा आहे हे लक्षात आल्यानंतर चित्रपटात मी नायिकाच असेन हा हट्ट करण्यापेक्षा माझ्या वाटय़ाला आलेली भूमिका किती सक्षम आहे आणि ती मला कशी रंगवता येईल, एवढाच माझा विचार असायचा. आज इतकी वर्ष सातत्याने काम केले आहे आणि त्यामुळेच श्याम बेनेगलांपासून ते राकेश मेहरा आणि अगदी विक्रमादित्य मोटवणे याच्यासारख्या आत्ताच्या पिढीतील दिग्दर्शकांबरोबरही चित्रपट करायला मिळाले. हा अभिनयाचा प्रवास माझ्यासाठी विलक्षण आहे’, असे दिव्या सांगते. दिव्याचा हा प्रवास खरोखरच विलक्षण आहे. कारण, सातत्याने सहाय्यक किंवा दुय्यम भूमिका करणे ही गोष्ट बऱ्याचदा कलाकारांकडून नकारात्मकरित्या घेतली जाते. आणि मग आपल्या अभिनयक्षमतेचा विकास करण्यापेक्षा याच गोष्टीच्या ताणाखाली कित्येकदा कलाकारांची कारकिर्दच धुळीला मिळते. करण जोहर निर्मित ‘जिप्पी’ या चित्रपटातील आईची भूमिका जशी दिव्यासाठी लिहिली गेली तसंच ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटात मिल्खा सिंग यांच्या आयुष्यात मोलाचा वाटा असणाऱ्या त्यांच्या बहिणीची इसरीची व्यक्तिरेखाही राकेश मेहरांनी दिव्यालाच डोळ्यासमोर ठेवून लिहिली होती. ‘मला जेव्हा राकेश मेहरांनी ही गोष्ट सांगितली तेव्हा इसरीची भूमिका तेही मिल्खा सिंग समोर असताना करायचं आव्हान पेलवणं शक्य होईल की नाही ही शंका मनात घोळत होती. पण, अशी आव्हानात्मक भूमिका तुमच्याचसाठी आहे, असं दिग्दर्शक सांगतो तेव्हा त्या परिक्षेत उतरणंच महत्त्वाचं असतं’, असं सांगत इसरीची भूमिका चपखल जमली ती फरहानच्या सहजतेमुळे हेही स्पष्ट करते. मुळात, फरहान मिल्खा सिंगच्या भूमिकेत इतका आत घुसला होती की सेटवर पहिल्या दिवसापासून माझ्यासमोर फरहान नव्हताच. त्यामुळे मलाही इसरी होणे फार जड गेले नाही, अशी आठवण दिव्याने सांगितली. विक्रमादित्य मोटवने दिग्दर्शित ‘लुटेरा’ मध्येही दिव्याने काम केले आहे. शाळेत असल्यापासून अभिनयाशी नाळ जोडली गेली होती. त्यामुळे शालेय स्तरावरचे सांस्कृतिक कार्यक्रम, नाटकं  इथपासून ते इथेच कारकिर्द घडवायची म्हणून पंजाब सोडून मुंबईत पोहोचलेल्या दिव्याला हा प्रवास सोपा नव्हता. आजही या नादात मी चुकीचा रस्ता निवडेन, अशी भिती आई-बाबांना वाटते. पण, आता भाग मिल्खा भाग, जिप्पी, लुटेरा, जिला गाझियाबाद अशा चित्रपटातून मला चांगल्या-चांगल्या भूमिकांमध्ये पाहिल्यांनंतर तेही आनंदित झाले आहेत. माझीही अवस्था वेगळी नाही, असे दिव्या सांगते. अभिनयाबरोबरच लिहिण्याची आवड असणारी दिव्या सध्या कादंबरी लेखनात मग्न आहे. माझी कादंबरी अध्र्याअधिक लिहून पूर्ण झाली आहे. ती जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आणखी एक वेगळं समाधान मनाला मिळेल. ’ असं ती आवर्जून सांगते.