बेलापूर येथील कर्मयोगी मुरलीधर खटोड जनलक्ष्मी पतसंस्थेच्या शहर शाखेतील सुमारे १ कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या शाखेच्या निलंबित व्यवस्थापकानेच हा घोटाळा केला असून, तब्बल २ वर्षांनंतर फिर्याद दाखल करण्यात आली आहे. त्यात एकूण सहा जणांना आरोपी करण्यात आले आहे.
खटोड पतसंस्थेच्या शहरातील शाखेत अपहार झाल्याचे प्रकरण गेल्या दोन वर्षांपासून गाजत असून निलंबित व्यवस्थापक राजेंद्र खंडेराव राशिनकर व पतसंस्थेने एकमेकांविरुद्ध फिर्यादी दाखल केलेल्या आहेत. आता व्यवस्थापक संजय सखाराम नागले यांनी १ एप्रिल २००९ ते ९ मार्च २०११ या कालावधीत बोगस कर्जासाठी खोटी दस्तावेज तयार केले व पतसंस्थेची फसवणूक केली म्हणून फिर्याद नोंदविली आहे. फिर्यादीवरून राजेंद्र राशिनकर, सुभाष खंडेराव राशिनकर, भाऊसाहेब खंडेराव राशिनकर, आदिनाथ बबनराव राशिनकर, प्रकाश बाळकृष्ण चिंतामणी व राहुल बाळकृष्ण चिंतामणी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
खटोड पतसंस्थेत राशिनकर हा १ जुलै १९८८ पासून लिपिक म्हणून काम करत होता. पतसंस्थेने श्रीरामपुरात शाखा सुरू केल्यानंतर त्याला १८ मार्च २००३ रोजी बढती देऊन शाखाधिकारी केले. त्याने बारा लोकांच्या नावावर खोटी कागदपत्रे तयार करून कर्ज काढले. तसेच बँकेच्या शाखेतील रकमेचाही अपहार केला. अपहाराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राशिनकर यास निलंबित करण्यात आले होते. आता तब्बल दोन वर्षांनंतर एक कोटीच्या अपहारप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मनोज राठोड हे करीत आहेत.